रावेर तालुक्यात विहिरींच्या पाणी पातळीत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 11:13 PM2018-05-04T23:13:07+5:302018-05-04T23:13:07+5:30
रावेर तालुक्यातील चिनावल, लोहारा, वडगाव, वाघोदा, दसनूर परिसरात गेल्या महिनाभरापासून विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट होतांना दिसत आहे.
आॅनलाईन लोकमत
चिनावल, दि.४ : रावेर तालुक्यातील चिनावल, लोहारा, वडगाव, वाघोदा, दसनूर परिसरात गेल्या महिनाभरापासून विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट होतांना दिसत आहे.
गेल्या पावसाळ्यात रावेर-यावल परिसरातील सातपुडा पर्वत राईत पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. पर्यायाने परिसरातील नद्या, नाले वाहू न शकल्याने गेल्या दीड ते दोन महिन्यापासून परिसरात जस-जशी तापमानात वाढ होत आहे. तसतशी विहिरी व कूपनलिकेच्या पाण्याच्या पातळीत घट होत असल्याने जुन्या व नवीन केळी बागा शिवाय सर्वच बागाईतदार शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे.
गेल्या आठ ते दहा वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने परिसराला यावर्षी पाण्याच्या टंचाईच्या दुर्भिक्षाला सामोरे जावे लागणार आहे.
गेल्या तीन महिन्यापूर्वी विहिरींमध्ये ५० ते ६० फूट पाणीसाठा कायम राहत होता. मात्र या पाणीसाठ्यात तब्बल २४ ते २५ फुटाची घट झाली आहे. सद्य स्थितीत मे हिटचा तडाखा पाहता भू-गर्भातील पाणी साठ्यात अधिकच घट होण्याची शक्यता वाढली आहे.
सद्य स्थितीत बहुतेक विहिरींची व ट्यूबवेलची पाणी पातळी कमी झाल्याने विहिरीतील मोटरपंप खाली होण्याचे काम शिवाय नवीन ट्यूबवेल करण्याची कामे परिसरात होताना दिसत आहेत. यामुळे शेतकºयांसमोर अनपेक्षीतरित्या आलेल्या पाण्याच्या संकटाने बागायती शेती धोक्यात येणार की काय? अशी शंका उपस्थित होत आहे.