पाणी व्यवस्थापनाने केली टंचाईवर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 03:55 PM2019-05-27T15:55:02+5:302019-05-27T15:55:32+5:30
लोहारी बुद्रुकची स्थिती : दहा दिवसांनी होणारा पाणीपुरवठा आला पाच दिवसांवर
उत्तम मनगटे।
सातगाव डोंगरी, ता. पाचोरा : राज्यात अनेक गावे दुष्काळाने होरपळत असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक गावांमध्ये पाण्याची पातळी खालावल्याने जनता व शासन चिंतातूर झाले आहे. मात्र पाण्याचे उत्कृष्ट व्यवस्थापन करीत पाचोरा तालुक्यातील लोहारी खुर्द व बुद्रुक ग्रामपंचायतीने टंचाईमुक्त करीत गावाला मुबलक पाणी पुरवठा सुरु केला आहे.
लोहारी खुर्द व बुद्रुक गावी ग्रुप ग्रामपंचायत आहे. आदिवासी असलेले आर्वे हे गाव या ग्रामपंचायत अंतर्गत येते. अनेक वर्षांपासून लोहारी गावी बहुळा प्रकल्पातून पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र यावर्षी धरण कोरडे पडले आहे. त्यात थोडेसेच पाणी शिल्लक आहे. गावाला पाणी पुरवठा करणारी विहिर आहे. या धरणाच्या विहिरीतील पाणीसाठा कमी झाला आहे. धरण गावापासून साडेसात किलोमीटर अंतरावर आहे. विहिर कोरडी पडल्याने ग्रा.पं.सह ग्रामस्थ चिंतातुर होते. मात्र सरपंच रंजना पाटील व त्यांचे पती प्रवीण पाटील यांनी गावाला पाणी कमी पडू नये म्हणून अनेकांशी चर्चा करीत कामाला सुरुवात केली. टंचाई आराखड्यातून जेव्हा पैसे मंजूर होईल तेव्हा होईल. मात्र ग्रामस्थांना पाणी उशिरा देता येणार नाही. या भावनेने त्यांनी स्वत:च्या खिशातून चार लाखांच्या दरम्यान खर्च केला. त्यामध्ये नवीन विहिर खोदण्यात आली. ती पुन्हा पंधरा फूट खोल करण्यात आली. विहिरीला तीन आडवे बोअर करण्यात आले. यामुळे मुबलक पाणी मिळाले. तत्पूर्वी धरणाच्या मुख्य नदीत जेसीबीच्या सहाय्याने खोल खड्डा खोदून त्याच्या दीडशे फूट अंतरावर दुसरा खड्डा खोदण्यात आला. त्या दुसऱ्या खड्ड्यात धरणातील असलेले पाणी मोटर पंपाद्वारे टाकण्यात आले. हे पाणी झिरपून यामध्ये काही दिवस तेथून पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र हा उपाय कमी पडत असल्याचे पाहून, नवीन शेवडीला खोल केले. त्यामुळे चांगल्यापैकी पाणी मिळाल्याने गावाला पाचव्या ते सहाव्या दिवशी प्रत्येक व्हॉल्व्हसाठी ४० ते ५० मिनिटे पाणी सोडण्यात येऊ लागले. अनेक ठिकाणी ६३ नवीन व्हॉल्व्ह टाकले. त्यामुळे पाणी गळती थांबली. धरण परिसरात एकूण पाच मोटारी वेगवेगळ्या ठिकाणी बसवलेल्या असून एक ते दीड किलोमीटर धरण परिसरात पाईप फिरविलेले आहे.
आर्वे व इंदिरानगर भागासाठी एका शेतकºयाची विहीर अधिग्रहित केली होती. मात्र या जलव्यवस्थापनामुळे पाणी मुबलक असल्याने शासनाचा होणारा अधिग्रहित विहिरीवरचा खर्च वाचला. अधिग्रहित केलेली विहीर रद्द करून तसे पत्र तहसीलदार पाचोरा यांना देण्यात आले आहे. जंगलातल्या विहिरींना पाणी नसल्याने शिवाय या गावात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने, दुधाळ जनावरांना पाणी पिण्यासाठी गावाबाहेर मोठे हौद करण्यात आले.
इतकेच नाही तर, विहिरीत पाणी साठा होताच नळाला पाणी सोडले जाते. पाणी सोडण्यापूर्वी स्वत: प्रवीण पाटील पाच दहा मिनिट अगोदरच पाणी सोडण्यात येत असल्याची सूचना देत असतात.
सरपंच यांच्यासह सुदेशना संदीप पाटील ग्रामपंचायत सदस्या, रत्नाबाई गजानन झाल्टे, हिराबाई पांडुरंग घुले, चंद्रभागाबाई एकनाथ कोळी, शानूरबाई चांद शहा, सयाबाई नाना भिल, श्रावण रामचंद्र बडगुजर, मुरलीधर त्र्यंबक पाटील यांचे सहकार्य मिळत आहे.
ग्रामपंचायतीने केलेल्या उत्कृष्ट जलव्यवस्थापनामुळे सद्यस्थितीला लोहारी खुर्द व बुद्रुक येथील ग्रामस्थांची तहान भागली आहे. त्यांचसोबत विहिर अधिकग्रहणाची शासनाची रक्कम देखील वाचली आहे.