एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील पाणीयोजना रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 08:29 PM2018-12-07T20:29:26+5:302018-12-07T20:33:13+5:30
प्रमोद पाटील कासोदा, ता. एरंडोल , जि.जळगाव : येथे सुमारे वर्षभरापूर्वी ११ कोटी रुपये खर्चाची कायमस्वरूपी योजना मंजूर झालेली ...
प्रमोद पाटील
कासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : येथे सुमारे वर्षभरापूर्वी ११ कोटी रुपये खर्चाची कायमस्वरूपी योजना मंजूर झालेली आहे, परंतु हे काम का रेंगाळले आहे, या योजनेतून गावाला कधी पाणीपुरवठा होईल याबाबत गावकऱ्यांच्या भावना तीव्र होऊ लागल्या आहेत. यंदा तर दुष्काळाच्या झळा तीव्र होणार आहेत,त्यामुळे प्रशासनाने या योजनेला आतापासूनच गती द्यावी, अशी मागणी होत आहे.
कासोदा गावापासून अंजनी धरणापर्यंतही पाईप लाईन येणार आहे. धरण परिसरात तीन विहिरी असून १० इंची पाईपलाईनद्वारा कासोदा ग्रामपंचायतीजवळ जलशुद्धीकरण प्रकल्प बांधण्यात येणार आहे. पूर्ण गावात नव्याने पाईपलाईन होणार आहे. त्यामुळे आपल्या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लागेल ही तमाम गावकºयांची स्वप्न आहेत. पण ती कधी प्रत्यक्षात साकार होईल या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी दिसत नाही, अशीदेखील चर्चा आहे.
सन १९९० सालापासून हे गाव पिण्याच्या पाण्यासाठी कायम चर्चेत आहे. घरात गरजेच्या सामानापेक्षा पिण्याच्या पाण्याची साठवणूक करणारी भांडी जास्त असतात, अशी परिस्थिती आहे. एकदा जर नळाला पाणी आले तर ते किमान आठ ते दहा दिवस साठवून ठेवावे लागते, कधी वीज बिलामुळे तर कधी पाईप लाईन फुटल्यावर जर नियमित पाणीपुरवठ्यात व्यत्यय आला तर १५ ते २० दिवसांनंतरदेखील पाणी मिळते, ज्या गावात पाणीटंचाई जास्त असेल त्या सगळ्याच गावापेक्षा येथील नागरिकांनी पाणीटंचाईचे जास्त चटके सोसले आहेत. सहनशिलता पण गावकºयांची वाढली आहे. पण आता आशेचा किरण दिसतो आहे. कायमस्वरूपी पाणीटंचाईपासून मुक्तता मिळाली. मिळणारी योजना मंजूर आहे पण काम कासव गतीने सुरू असल्याने हे काम कधी पूर्ण होईल याकडे गावकºयांचे लक्ष लागून आहे.
कासोदा ते एरंडोल रस्त्यावरील अंजनी धरणापर्यंत सुमारे सात-आठ किलोमीटर अंतरावर पाईप टाकून पडले आहेत. १० इंची हे पाईप आहेत. गावाची हल्ली ४० हजारावर लोकसंख्या आहे. गाव झपाट्याने वाढत आहे. पुढील दहा-पंधरा वर्षात ही लोकसंख्या आणखी वाढणार आहे. एकदा झालेली योजना पुन्हा पुन्हा होत नाही. कालांतराने या योजनेतील पाणी गावासाठी अपूर्ण पडू नये, यासाठी हे पाईप जास्त मोठ्या व्यासाचे असायला हवे होते, अशीदेखील काही जाणकारांकडून चर्चा होत आहे. दरम्यान, कासोदा सरपंचाशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
-पैसा आहे, इतर कुठलीच तांत्रिक अडचण नाही, एक वर्षापूर्वीच योजना मंजूर आहे, आतापर्यंत काम पूर्ण झाले पाहिजे होते. पण काय अडचण येते आहे हे माहीत नाही, कोण शुक्राचार्य आडवा येतो आहे यासाठी आम सभेतदेखील हा विषय घेतला होता. लक्षवेधी व कपात सूचनेद्वारे याविषयाचे गांभीर्य सभागृहात मांडले आहे.
गावाला पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवू नये यासाठी सोळागाव योजनेचे ३५ लाख रुपये जिल्हा परिषदेने तातडीने दिले असते, तर इतके दिवस वीज कपात झाली नसती, पर्यायाने जनतेला पाण्यासाठी वणवण भटकावे लागले नसते. आमदाराने जरी गाव दत्तक घेतले असले तरी ते घरून वीज बिल भरणार नाहीत. कासोद्यासाठी तातडीची योजना स्वत: एक लाख रुपये खर्च करून सुरू करून घेतली होती, हे गावकºयांना चांगले माहीत आहे.
-आमदार डॉ.सतीश पाटील
दिवाळी ची सुटी होती, पण आता काम सुरू झाले आहे. ठेकेदाराने जास्त विलंब केला तर मुंबईत जावून मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे हे गाºहाणे मांडणार आहे. गावाला पाणीटंचाई जाणवू नये यासाठी सोागाव योजनेचे जिल्हा परिषदने वीज बिल भरले आहे. १६ लाख रुपये पाईप लाईन दुरूस्ती, लिकेज काढणे व जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्यासाठी दिले आहे. अभियंता नरवाडे यांना या पाईपलाईनची दुरूस्ती व लिकेजची पाहणी करण्यासाठी पाठवणार आहे. ग्रामपंचायतने योग्य नियोजन केल्यास कायमस्वरूपी योजना सुरू होईपर्यंत सोळागाव योजनेचे पाणी गावाला अपूर्ण पडणार नाही.
-उज्ज्वला पाटील, अध्यक्षा, जिल्हा परिषद, जळगाव
काम संथ गतीने सुरू आहे. तीन विहिरींचे काम ९० टक्के झाले आहे. पाईप येवून पडले आहेत. जलशुद्धीकरण प्रकल्पाचे आर्किटेक्टकडून डिझाईन येणार आहे, ते आल्यावर काम सुरू होईल, पण ठेकेदाराला मार्च २०२० ही मुदत असल्याने तो मुदतीच्या आत काम पूर्ण करणार आहे.
-बी.जे.पाटील, उपअभियंता, जीवन प्राधिकरण.