जलसंपदा मंत्री जिल्ह्याचे असताना महाराष्ट्राचे पाणी गुजरातला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 09:27 PM2019-04-13T21:27:56+5:302019-04-13T21:28:12+5:30
कोळगाव येथील सभा : छगन भुजबळांचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल
भडगाव/ खेडगाव/गुढे : ज्या राज्याच्या जमिनीवर पावसाचे पाणी पडेल ते त्या राज्यालाच मिळायला हवे, असे आपल्या आघाडी सरकारच्या काळातील धोरण असताना महाराष्टÑाच्या हक्काचे पाणी गुजरातला जातेय... तेही या जिल्ह्याचे जलसंपदा मंत्री असताना, अशी जोरदार टीका माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघाचे रा.कॉ.चे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ कोळगाव येथे आयोजित सभेत केली.
यावेळी जोरदार हल्ला करताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने जुलै २०१७ मध्ये पाणी पळविण्यासंबंधीच्या कराराची केलेली कागदपत्रे आपले सरकार आल्यावर आपण फाडून टाकू. त्यांनी आपल्या पाऊण तासाच्या भाषणात पंतप्रधान नंरेद्र मोदी यांनाच लक्ष्य केल्याचे दिसून आले.
विधानसभचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी भाषणात आपले पाणी गुजरातला जातेय यावरुन नारपारचा केलेला नामोल्लेख व माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांनीदेखील भुजबळ आपण नारपारचे नेतृत्व करा, आम्ही आपल्या नेतृत्वाखाली लढण्यास तयार आहोत, प्रसंगी रक्त सांडले तरी चालेल असे भावनिक आवाहन केले. हाच मुद्दा पकडत भुजबळ यांनी या भागातील केळी बागायत नष्ट होत चालल्याची खंत व्यक्त करीत, जलसंपदामंत्र्यांनी एवढे काम केले असते तर शेतकऱ्यांनी दुवा दिली असती असे सांगत तापीचे अजूनही १०० टीएमसी पाणी गुजरातला जातेय ते सत्तेत आल्यावर अडविण्याची ग्वाही दिली.
भुजबळांनी वाचला पाचचा पाढा
भुजबळांनी मोदी सरकारचे अपयश पाच अंकात मांडले. पाच स्मार्ट सिटी दाखवा, जिल्ह्यात पाच गावात शौचालये व हॉस्पिटल्स दाखवा, पाच राज्यात १००० कि.मी.रस्ते दाखवा, पाच स्वच्छ राज्ये, पाच राज्यातील विजनीर्मिती दाखवा, शेजारच्या पाच देशातुन गुंतवणूक दाखवा, पाच कि.मी.गंगा स्वच्छ झाल्याचे दाखवा असे म्हणत जुमलेबाज सरकार असल्याची टीका केली.
व्यासपिठावर अरुणभाई गुजराथी, वसंतराव मोरे, डॉ.सतीश पाटील, गुलाबराव देवकर, रवींद्र पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, राजीव देशमुख, गफ्फार मलिक, प्रदीप पवार, दत्तात्रय पवार, शशीकांत साळुंखे, संजय वाघ, संजय गरुड, ज्ञानेश्वर महाजन, अॅड. विश्वास भोसले, तिलोत्तमा पाटील, प्रमोद पाटील, राघेश्याम चौधरी, संतोष महाजन, शालीग्राम मालकर, योजना पाटील आदी उपस्थित होते.