आनंदनगर तांड्याला १५ वर्षापासून पाणी टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:00 PM2018-11-19T22:00:43+5:302018-11-19T22:04:35+5:30
दुष्काळ आणि दुर्लक्ष या नैसर्गिक आणि मानवी समस्यांनी ग्रासलेल्या आनंदनगर तांड्यातील नागरिक त्रस्त होत आहेत.गेल्या १५ वर्षांपासून गावात भीषण पाणी टंचाई असताना लोकप्रतिनिधींकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे.
निपाणे, ता.एरंडोल : दुष्काळ आणि दुर्लक्ष या नैसर्गिक आणि मानवी समस्यांनी ग्रासलेल्या आनंदनगर तांड्यातील नागरिक त्रस्त होत आहेत.गेल्या १५ वर्षांपासून गावात भीषण पाणी टंचाई असताना लोकप्रतिनिधींकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. पाणी टंचाई आणि रोजगाराचे साधन नसल्याने अर्धे गाव स्थलांतरीत झाल्याची भीषण स्थिती आहे.
आनंदनगर तांडा हे आदिवासी बांधवांचे गाव आहे. गावातील १३० कुटुंबाची ८८९ लोकसंख्या आहे. गावावर दुष्काळाचे सावट असल्याने जवळपास ३०० ते ३५० नागरिक परराज्यात ऊस तोडण्यासाठी गेले आहेत. ३० कुटुंबांची घरे बंद आहेत.
लोकप्रतिनिधींना गावबंदीचा इशारा
आनंदनगर तांडा येथे सुमारे १५ वर्षांपासून भीषण पाणी टंचाई आहे. सन २०१७ मध्ये मुख्यमंत्री पेय जल योजनेत आनंदनगर गावाचा समावेश केला आहे. मात्र आतापर्यंत ही योजना पुढे सरकलेली नाही. लोकप्रतिनिधींच्या सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये संतप्त वातावरण आहे. त्यामुळे आगामी काळात लोकप्रतिनिधींना गावबंदी करीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा सरपंच वंदना राठोड, उपसरपंच ग्यारशीबाई राठोड, ग्रा.पं.सदस्य भास्कर राठोड, सामाजिक कार्यकर्ते भास्कर राठोड यांनी दिला आहे.
निधीअभावी विकास कामे ठप्प
गावातील पथदिव्याचे सिमेंट खांब व तार हे पूर्णपणे जीर्ण झाले आहे. काही खांब तुटलेले आहेत. भास्कर राठोड यांच्यासह काही ग्रामस्थांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत लेखी व तोंडी तक्रार दिली आहे. मात्र त्यानंतरही कामे झाली नाही. भविष्यात मोठी हानी होण्याची शक्यता आहे.
अधिग्रहीत विहिरीचे पाणी आटले
सन १९९५ पूर्र्वी आनंदनगर तांडा हे निपाणे ग्रुप ग्रामपंचायत होती. त्यानंतर आनंदनगर तांडा ही स्वतंत्र ग्राम पंचायत झाली. निपाणे वॉटर सप्लाय मार्फत तांड्यासाठी पाणी पुरवठा केला जात होता. मात्र निपाणे गावासाठी पाणी कमी पडु लागल्याने तांडाचे पाणी बंद करण्यात आले व १६ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेत आनंदनगर गावाचा समावेश करण्यात आला. परंतु १६ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पाणी पट्टी महाग पडत असल्याने ही प्रादेशिक योजना बंद केली. त्यानंतर तांड्याला भीषण पाणी टंचाई जाणवू लागली. त्यानंतर माजी सरपंच विजय धनराज राठोड यांची विहीर अधिग्रहण केली. मात्र गेल्या २ ते ३ वर्षांपासून दुष्काळीस्थिती असल्याने विहिरीला देखील पाणी नाही.