खान्देशातील सात पाणी प्रकल्पांच्या घशाला कोरड!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 05:26 PM2024-05-15T17:26:35+5:302024-05-15T17:26:44+5:30

जळगाव जिल्ह्यातील मन्याड, बोरी, भोकरबारी, अग्नावती, हिवरा प्रकल्पातील जलसाठा शून्यावर आला आहे. धुळ्यातील सोनवद आणि अमरावती प्रकल्पातही तीच स्थिती आहे.

water scarcity in seven water projects in Khandesh | खान्देशातील सात पाणी प्रकल्पांच्या घशाला कोरड!

खान्देशातील सात पाणी प्रकल्पांच्या घशाला कोरड!

कुंदन पाटील

जळगाव : खान्देशातील सात प्रकल्पातील जलसाठा शून्यावर आला आहे. तसेच जळगावच्या हतनूरमध्ये ४० तर गिरणा धरणात केवळ २१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मान्सून लांबल्यास भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

जळगाव जिल्ह्यातील मन्याड, बोरी, भोकरबारी, अग्नावती, हिवरा प्रकल्पातील जलसाठा शून्यावर आला आहे. धुळ्यातील सोनवद आणि अमरावती प्रकल्पातही तीच स्थिती आहे. मोठे, मध्यम आणि लघू प्रकल्पांमध्ये बुधवारी ६२३.१४ दलघमी एवढा उपयुक्त साठा शिल्लक आहे. जळगावसाठी जीवनदायी ठरणाऱ्या हतनूर आणि गिरणा धरणातील साठाही ओसरला आहे. तसेच वाघूरमध्ये ६५.६८ टक्के इतका साठा आहे. अन्य काही प्रकल्पातील साठा अतिशय नाजूक आहे. मे महिन्याच्या मध्यान्हात बहुतांशी प्रकल्पांच्या घशाला कोरड पडली आहे. मान्सून १२ जूनपर्यंत दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मान्सून वेळेवर दाखल झाल्यास पाणीटंचाईसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील चाराटंचाईचाही प्रश्न सुटणार आहे.

आवर्तन जूनमध्येच
१५ मेपर्यंत गिरणा धरणातून आवर्तनाची एकही मागणी आलेली नाही. तसेच बिगर सिंचनासाठी शेवटचे आवर्तन शिल्लक आहे. हे आवर्तन सुटल्यानंतर गिरणा धरणातील उपयुक्त साठा शून्यावर येणार आहे. त्यामुळे प्रशासनही ‘अलर्ट’मोडवर आहे. जून महिन्यात पाऊस लांबल्याची चिन्हे पाहून पहिल्या आठवड्यात आवर्तन सोडण्याविषयी निर्णय घेतला जाणार आहे.

प्रकल्पनिहाय जलसाठा
प्रकल्प-टक्केवारी
हतनूर-४०.५९
गिरणा-२१.१६
वाघूर-६५.६८
सुकी-६५.६०
अभोरा-६७.५६
तोंडापूर-१९.७५
मंगरुळ-४४.५१
बहुळा-१४.७८
मोर-६६.६२
अंजनी-३.८४
गूळ-४८.८७
सुलवाडे बॅरेज-३७.६४
पांझरा-२४.१५
मालनगाव-३३.५४
जामखेडी-२७.३९
कनोली-२.३७
बुराई-६.४०
अनेर-६०.०६
करवंद-३८.७७

गिरणा धरणातून शेवटचे आवर्तन सोडण्याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. या पंधरवड्यानंतर मागणीनुसार आवर्तन सोडण्याचा निर्णय जिल्हास्तरीय समिती घेईल.
-देवेंद्र अग्रवाल, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग.

Web Title: water scarcity in seven water projects in Khandesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.