नशिराबादला पाणीटंचाईच्या झळा तीव्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:16 AM2021-04-08T04:16:40+5:302021-04-08T04:16:40+5:30
नशिराबाद : वर्षानुवर्षे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या नशिराबाद गावासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कार्यान्वित झाली नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत ...
नशिराबाद : वर्षानुवर्षे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या नशिराबाद गावासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कार्यान्वित झाली नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. एप्रिल महिन्यात तब्बल आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. गावात पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतांची पातळी खोल गेल्याने ग्रामस्थांना टंचाईची झळ बसत आहे. त्यातच ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी ग्रामस्थांना शुद्ध पाण्यासाठी वंचित राहावे लागत आहे. संभाव्य पाणीटंचाईबाबत आतापासूनच नियोजन व्हावे, अशी मागणी आता ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून नशिराबादचा लौकिक आहे. मात्र नियोजनाअभावी ग्रामस्थ दरवर्षी पाणीटंचाईला तोंड देत असतात. ग्रामस्थ गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करीत आहे. निवडणुकीत ग्रामस्थांना पाणीसमस्येवर आश्वासने दिली जातात. मात्र आजपर्यंत कायमस्वरूपी पाणी योजना कार्यान्वित झालेली नाही. पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. जानेवारीपासूनच टंचाईची झळ ग्रामस्थांना बसत असते.
जलपातळी खालावल्याने हाल
सध्या गावात बेळी, मुर्दापूर, नशिराबाद पेठ या ठिकाणांहून पाणीपुरवठा होत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून बेळी येथील वाघूर नदीपात्रातील विहिरीतील पातळी खोल गेल्याने पाणीटंचाईत भर पडली आहे. आता तब्बल आठव्या तर कधी नवव्या दिवशी ग्रामस्थांना पाणी मिळते. दरम्यान, मुर्दापूर धरणाजवळील विहिरीची जलपातळी वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने खोल जाण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाईची भीषणता वाढण्याची शक्यता आहे.
१६ कोटींची योजना पाण्यात
गावाच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा म्हणून सोळा कोटी रुपयांची पाणीयोजना मोठा गाजावाजा करीत कार्यान्वित करण्यात आली. मात्र सुरुवातीपासून आतापर्यंत अनेक अडथळ्यांचे विघ्न आल्याने शुद्ध पाण्यापासून ग्रामस्थ वंचितच राहिले. काही वर्षे ही योजना ‘मजीप्रा’ने हाताळली. आता ही योजना ग्रामपंचायतीच्या ताब्यात घेण्यात आली आहे. मात्र या योजनेसाठी लाखो रुपयांची वीज वापरली जाणार असल्यामुळे या योजनेची बिल ग्रामपंचायतीला परवडणारे नाही. लाखो रुपये थकीत असल्यामुळे शेळगाव येथील नशिराबादला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा वीजपुरवठा गेल्या महिन्यापासून खंडित केला आहे.
तहानलेल्यांसाठी हात सरसावतील का?
ऐन उन्हाळ्यात शुद्ध पाणी योजना थकीत वीज बिलामुळे बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थ शुद्ध पाण्यापासून दीड महिन्यापासून वंचित आहेत. गावात अंधार असल्याने लोकप्रतिनिधींनी मदतीचा हात पुढे केला हे कौतुकास्पद आहे. त्याप्रमाणे त्यांचे हात पाण्यासाठीही सरसावतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.