नशिराबादच्या पाणी योजनेबाबत टोलवाटोलवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:07 PM2018-06-01T13:07:19+5:302018-06-01T13:07:19+5:30
ग्रामस्थांची गैरसोय
आॅनलाइन लोकमत
नशिराबाद, जि. जळगाव, दि. १ - वर्षानुवर्षांपासून पाण्यासाठी संघर्ष सुरू असला तरी अद्यापही नशिराबादकर पाण्यासाठी शापितच ठरल्यागत आहे. पाणी टंचाईची बोंबाबोंब होऊनही उदासीन शासन व अधिकाऱ्यांनी मात्र पाणी योजनेबाबत ग्रामस्थांना वाटाण्याच्या अक्षदा लावल्या. मे महिना संपला तरीही योजनेची अद्याप चाचणीच सुरू आहे. उन्हाळा जवळपास संपला तरी ग्रामस्थांची तहान भागली नाही. येत्या आठवडाभरात योजनेचे शुद्ध पाणी मिळणार असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात योजनेचे पाणी मिळेल तो दिवस उजाडण्याची सर्वच जण वाट पाहत आहे.
गावाला पाणीपुरवठा करणाºया जलस्त्रोतांची पातळी खोलवर गेल्याने व ठोस पर्यायी योजनाही नसल्याने येथे जानेवारीपासून टंचाईचा सामना ग्रामस्थ करीत आहे. हंडाभर पाणी मिळविण्यासाठी प्रचंड हाल होत आहे. आतापर्यंत १० ते १३ दिवसाआड झालेल्या पाणीपुरवठ्यामुळे सर्वच हैराण आहे.
नशिराबादला पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सुमारे १६ कोटी रुपयांची जलशुद्धीकरण योजनेचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. योजना सुरू होण्याबाबत आश्वासने व तारीख पे तारीख मिळाली. हतबल झालेले ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला. मात्र संबंधित विभागाने सहानुभूतीपूर्वक आठवडाभरात पाणी सुरू होईल, अशी विनंती करीत आंदोलनाला स्थगिती दिली. त्यानंतर पंप दुरुस्ती, बसविणे आदी कामे सुरू असल्याचे सांगत मे महिन्याचा पंधरवाडा लोटला अन् त्यानंतर चाचणी सुरू झाली. त्यातही पाईपलाईन फुटल्याने पुन्हा खोडा आला. मे अखेर नशिराबादला योजनेच्या ठिकाणी पाणी पोहचले. अद्याप चाचणीच सुरू असल्याने शुद्ध पाण्यासाठी ग्रामस्थ तहानलेलेच आहे. उन्हाळा संपला मात्र पाणी योजनेची प्रतिक्षा कायमच असल्याचे ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहे. जीव गेल्यावर शुद्ध पाणी देणार काय? असा संतप्त प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.दरम्यान पाणी समस्येवर मात करण्यासाठी वाघूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याच्या मागणीला मंजुरी मिळाली. त्यामुळे वाघूरचे आवर्तन सुटल्यानेच टंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत झाली. वाघूरच्या आवर्तनाने तरले हे मात्र तितकेच खरे.
नियोजनाचा फज्जा उडाला
वाघूर बेळी, मुर्दापूर धरण व स्थानिक जलस्त्रोतातून गावाला पाणीपुरवठा होतो. मात्र त्याची भूजल पातळी कमी झाल्याने टंचाईची तीव्रता वाढली व पाणीपुरवठा व्यवस्था कोलमडली. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अद्यापपर्यंत ठोस उपाययोजनाच कार्यान्वित नसल्याने नशिराबादकरांना टंचाईचा सामना करावाच लागत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात टंचाईच्या तीव्रतेवर मात होईल तसे नियोजन असल्याचा लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. शेळगाव बॅरेजची जलशुद्धीकरण योजनाच अद्यापही कार्यान्वित न झाल्याने व एमआयडीसी पाणीप्रश्नी तोडगा न निघाल्याने सर्वच नियोजनाचा फज्जा उडाला.
पाणी समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीने परिपूर्ण प्रयत्न केले. बोरींग करून पाणीपुरवठा सुरळीत केला. मात्र जलस्त्रोतच आटल्याने टंचाई वाढली. त्यातच एमआयडीसी पाणीप्रश्नी तोडगाच निघाला नाही. पाणी योजनेकामी अधिकाºयांनी दिशाभूल केली त्यामुळे योजना कार्यान्वितेची प्रतिक्षा आहे.
-विकास पाटील, सरपंच.
पाणी योजनेच्या चाचणीचे काम सुरू आहे. नशिराबादला जलशुद्धीकरण ठिकाणी पाणी आले असून चाचणी कार्यात आढळलेल्या त्रुटीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या ४ ते ५ दिवसात योजना पूर्णपणे कार्यान्वित होईल व सुरळीत पाणीपुरवठा सुरू होईल.
-एस.सी.निकम, कार्यकारी अभियंता, मजिप्र.