पाण्याचा निचरा होण्यासाठी बोगदा न केल्याने शेतकऱ्यांच्या शेतात शिरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:14 AM2021-06-02T04:14:48+5:302021-06-02T04:14:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दळणवळणाच्या विकासासाठी रेल्वे प्रशासनातर्फे तिसरा रेल्वे मार्ग उभारण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने शिरसोलीच्या पुढे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दळणवळणाच्या विकासासाठी रेल्वे प्रशासनातर्फे तिसरा रेल्वे मार्ग उभारण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने शिरसोलीच्या पुढे दापोरा शिवारात पाण्याचा निचरा होण्यासाठी रेल्वे रुळाखालून बोगदा न उभारल्याने रविवारी झालेल्या पावसाचे सर्व पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरले आहे. यामुळे शेतकऱ्यांतर्फे रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. ऐन हंगामात आता पीकपाणी कसे घ्यायचे, असा प्रश्न येथील शेतकरी बांधवांमधून उपस्थित करण्यात येत आहे.
भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे गेल्या दोन वर्षांपासून जळगाव ते मनमाडदरम्यान तिसरा रेल्वे मार्ग उभारण्यात येत आहे. या मार्गाचा पहिला टप्पा शिरसोलीपर्यंत बऱ्याच ठिकाणी पूर्ण झाला आहे. शिरसोलीच्या पुढे तिसरा मार्ग उभारण्यासाठी जमीन सपाटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, रेल्वे प्रशासनातर्फे या कामासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराने शेतातील पाण्याचा निचरा होणारा जुना बोगदा बुजवून त्या ठिकाणी पुन्हा तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी रूळ टाकल्यानंतर नवीन बोगदा मात्र उभारलाच नाही. यामुळे शेतातील पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार ना बोगदा नसल्यामुळे हे पाणी शेतातच तुंबत आहे.
इन्फो :
पाच ते सहा शेतकऱ्यांच्या शेतात तुंबले पाणी
रविवारी झालेल्या अवकाळी पावसाच्या पाण्याला शेतातून बाहेर पडायला जागाच नसल्यामुळे हे पाणी शेतातच तुंबले होते. यामुळे पुंडलिक सुरवाडे, नाना गवंदे, बापू गवंदे, बापू मराठे, माणिक गवंदे या शेतकऱ्यांच्या शेतात गुडघ्यापर्यंत पाणी तुंबले होते. विशेष म्हणजे प्रत्येक शेतकरी बांधवांच्या शेतातील दोन ते तीन एकरचा भाग या पाण्याखाली आला आहे. पावसाळ्यापूर्वी शेतकरी बांधवांनी टाकलेली खते या पाण्यामुळे वाहून गेली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात आता पिकांची पेरणी करता येणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यामुळे यंदा शेती कशी करायची, असा प्रश्न या शेतकरी बांधवांमधून उपस्थित करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने आर्थिक नुकसानभरपाई देण्याचीही मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.
इन्फो :
तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने सांगूनसुद्धा, शेतातील पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार किंवा बोगदा तयार केलेला नाही. पावसाचे पाणी आमच्या शेतात शिरत आहे, त्यामुळे आता शेती कशी करावी, असा प्रश्न पडला आहे.
गोपाळ काळे, शेतकरी
तिसरी रेल्वेलाइन टाकताना संबंधित ठेकेदाराने पूर्वीचा या ठिकाणी असलेला बोगदा बुजविला आहे. मात्र, तिसऱ्या लाइनचे काम झाल्यानंतर अद्यापही बोगदा न केल्यामुळे या पाण्याला बाहेर पडायला जागा राहिलेली नाही. या सर्व प्रकाराला ठेकेदार जबाबदार असून, त्याच्यावर रेल्वे अधिकाऱ्यांनी कारवाई करायला हवी.
गोकुळ तांदळे, शेतकरी
तिसऱ्या रेल्वे मार्गावरील दापोरा शिवारातील नेमक्या कुठल्या ठिकाणी शेतात पाणी जात आहे, याची अद्याप तक्रार आलेली नाही. याबाबत माहिती घेऊन, योग्य ती उपाययोजना करतो.
पंकज डावरे, उपमुख्य अभियंता, भुसावळ रेल्वे विभाग