एरंडोलकरांवर पाणीटंचाईचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:18 AM2018-07-13T00:18:43+5:302018-07-13T00:19:36+5:30
महिनाभर पुरेल एवढाच साठा : पर्यायी व्यवस्था करण्याचे पाटबंधारे विभागाचे पालिकेला निर्देश
एरंडोल, जि.जळगाव : एरंडोल शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अंजनी धरणात एक महिना पुरेल एवढाच मृत पाणीसाठा शिल्लक आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने एरंडोलकरांवर ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश गिरणा पाटबंधारे विभागाने पालिकेला दिले आहेत.
अंजनी धरणातील जलाशयात ०.५९२ द.ल.घ.मी. एवढाच पाणीसाठा सद्य:स्थितीत उपलब्ध आहे. एरंडोल शहराला रोज होणारा पाणीपुरवठा लक्षात घेता एखाद्या महिनयापर्यंत पाणीपुरवठा होणे शक्य आहे. भविष्यात पाऊस न पडल्यास धरणातील पाणीसाठा संपुष्ठात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
‘अंजनी’च्या जलसाठ्यातून एरंडोलसाठी ६० द.ल.घ.फू. व कासोद्यासाठी १५ द.ल.घ.फू. एवढे पाणी आरक्षित करण्यात आले आहे. परंतु धरणात पुरेसे पाणी उपलब्ध न झाल्यामुळे यावर्षी पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून २० द.ल.घ.फू. पाण्याचा साठा जामदा डाव्या कालव्यामार्फत पुनर्भरण करून साठा करण्यात आला. त्यामुळे एरंडोल व कासोदा या मोठ्या गावांना पाणीटंचाई मुक्त करण्यात आले.
विशेष हे की, जवळपास गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून ‘अंजनी’च्या मृत साठ्यातून एरंडोलला पाणीपुरवठा होत आहे.
या धरणाचे पाणलोट क्षेत्र २३४.३४ चौ.कि.मी. आहे. अंजनी नदीचा उगम पारोळा तालुक्यातील चोरवड, शिरसमणी परिसरातून होतो. १५ ते २० छोटे-मोठे नाले या नदीला मिळतात.
सर्वांत मोठा नाला लोणी बुद्रूक व लोणी खुर्द गावांमधला आहे. अंजनी धरणाचे ६० टक्के पाणलोट क्षेत्र पारोळा तालुक्यात व ४० टक्के एरंडोल तालुक्यात आहे. जवळपास १६० कोटी रूपये खर्च पाण्यासारखा या प्रकल्पावर झाला. पण तरीसुद्धा या धरणाला ड्रिंकींग वॉटर टँकचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
२०१३ मध्ये अंजनी धरणाच्या जलाशयाचे पाणी नदी पात्रात सोडण्याच्या प्रयत्नाला सर्वपक्षीय नेत्यांनी प्रखर विरोध केला होता. पाणी सोडले असते तर एरंडोल शहराला भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले असते.
तर भयावह स्थिती
दरम्यान, दरवर्षी पावसाची कमतरता, अपुरा पाऊस या कारणामुळे धरणात पूर्ण क्षमतेने जलसाठा होत नाही म्हणून पाणीटंचाई निर्माण होण्यासारखी स्थिती निर्माण होते.
‘लोकमत’ वृत्ताची दखल
१२ जुलैच्या ‘लोकमत’मध्ये एरंडोल शहराच्या संभाव्य पाणीटंचाईबाबत वृत्त प्रसिद्ध झाले. त्या वृत्ताची दखल घेऊन गिरणा पाटबंधारे उपविभागाने पालिकेला तत्काळ पत्र पाठवून पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे सूचित केले आहे.