जळगाव जिल्हा रुग्णालयात पाण्याविना रुग्ण व नातेवाईकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 11:57 PM2018-05-20T23:57:20+5:302018-05-20T23:57:20+5:30
बोअरिंग सुरू न केल्याने पाणपाईवरही ठणठणाट
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २० - जिल्हा रुग्णणालयातील बोअरिंग सुरू न केल्याने पाण्याच्या टाक्या भरल्या गेल्या नाही व त्यामुळे रुग्णालयातील पाण्याचा आधार असलेल्या पाणपोईतही पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे सकाळपासूनच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे प्रचंड हाल झाले.
जिल्हा रुग्णालयात पिण्याच्या पाण्याच्या ठिकठिकाणी चार पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आलेल्या आहेत. यात बहुतांश वेळा पाणी उपलब्ध नसते. त्यामुळे सेवालयानजीक असलेल्या संत बाबा गुरुदासराम चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने उभारण्यात आलेल्या पाणपोईवर दररोज रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची पाण्यासाठी गर्दी होत असते.
रविवारी मात्र जिल्हा रुग्णालयातील बोअरिंग सुरू न केल्याने या पाणपाईवरील पाण्याची टाकी भरली गेली नाही. त्यामुळे सकाळपासून येथे पाणी उपलब्ध न झाल्याने मोठे हाल झाले. प्रत्येक मिनिटा-मिनिटाला रुग्ण, त्यांचे नातेवाईक पाण्यासाठी बाटल्या घेऊन येत होते. मात्र पाणी नसल्याचे पाहून त्यांना माघारी परतावे लागले.
नातेवाईकांनी बाहेरून आणले पाण्याचे जार
पाणी मिळत नसल्याने अति दक्षता विभागात दाखल असलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकाने बाहेरून पाण्याचे जार विकत आणले. स्वत: ते पाणी पिण्यासह इतरही रुग्णांना पाण्याची मदत केली.
दररोज पाच हजार लिटर पाण्याचा वापर
रुग्णालय परिसरातील सेवालयानजीकच्या या पाणपोईवर एक हजार लिटरची पाण्याची टाकी बसविलेली आहे. दररोज येथून पाणी नेले जात असल्याने दिवसातून ती पाच वेळा भरावी लागते. त्यामुळे येथून दररोज पाच हजार लिटर पाणी रुग्णांना उपलब्ध होते. मात्र आज बोअरिंगच सुरू न झाल्याने पाण्याचा थेंबही मिळू शकला नाही.