पहूर येथील संतोषीमातानगरात भर पावसाळ्यात पाणी टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 03:13 PM2020-08-03T15:13:36+5:302020-08-03T15:16:18+5:30
नागरिक संतप्त : पंधरा दिवसाआड मिळते पाणी
पहूर ता जामनेर:- पेठ ग्रुपग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या संतोषीमातानगराला तब्बल पंधरा दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार या भागातील रहिवाशांचा आहे. याबाबत संताप व्यक्त होतअसून पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास हंडामोर्चा काढला जाईल असा ईशारा दिला आहे.
येथील पाणीपुरवठा ज्या धरणांवर अवलंबून आहे, ते मोतीआई व गोगडी धरण शंभर टक्के भरले असूनही संतोषीमातानगराला पुरेसा पाणीपुरवठा पेठ ग्रामपंचायत कडून होत नसल्याच्या संतप्त भावना रहिवासी प्रविण विठ्ठल कुमावत यांनी सोशल माध्यमावर व्यक्त केल्या आहेत.
शासन घरी राहा सुरक्षित राहा असे सांगत असताना आमच्याकडे भरपावसाळ्यात पिण्यासाठी व वापराला पाणी मिळत नाही. घरात कसे राहणार असा प्रश्न उपस्थित करून पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास हंडामोर्चा काढण्याचा ईशारा कुमावत व काही नागरिकांनी दिला. सोशल माध्यमावर संतोषीमातानगर असा ग्रुप असून यावर हा संदेश सोमवारी झळकत होता.दरम्यान सकाळी संतोषीमातानगरात पाणी पुरवठा झाल्याचेही नागरिकांनी सांगितले आहे.
प्रतिक्रिया.......
गावाला नियमितपणे पाच ते सहा दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. मात्र गोगडी धरणातून पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने जोडणी साठी कर्मचाऱ्यांना पाणी जास्त असल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे थोडासा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून आज रोजी सुरळीत आहे.कामे करतांना निधीची आवश्यकता भासत असल्याने नागरिकांना थकीत कर भरावे व सहकार्य करावे.
- निता रामेश्वर पाटील, सरपंच, पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत