वाघूर पुलाच्या फाउंडेशनमध्ये फुटले पाण्याचे झरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 03:42 PM2020-09-12T15:42:35+5:302020-09-12T15:42:43+5:30
समांतर पूल बांधणीसाठी वाघूर नदीत फाउंडेशनच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या फाउंडेशनमध्ये चक्क पाण्याचे झरे फुटल्याने निसर्गाचे एक वेगळा स्वरूप येथे पाहावयास मिळत आहेत.
वासेफ पटेल
भुसावळ : महामार्ग चौपदरीकरणाचे कार्य सुरू असून भुसावळ-जळगाव वाघूर पुलाचे कार्य पूर्ण झाले आहे. यावरून वाहतूक सुरळीत सुरू आहे. त्याच बाजूला समांतर पूल बांधणीसाठी वाघूर नदीत फाउंडेशनच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या फाउंडेशनमध्ये चक्क पाण्याचे झरे फुटल्याने निसर्गाचे एक वेगळा स्वरूप येथे पाहावयास मिळत आहेत.
सन २०१९ मध्ये बेमोसमी पाण्याने महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात अनेक वेळा खंड पडला. यानंतर पाऊस थांबताच महामार्ग कामाला जोरात सुरुवात झाली. मात्र २२ मार्चपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन केले. यातच महामार्गाच्या कामासाठी असलेले परप्रांतीय मजूर भीतीपोटी आपापल्या राज्यात निघून गेले. यामुळे महामार्गाच्या कामात अनेक अडचणी निर्माण झाल्या. अशातच वाघूर नदीचा भुसावळकडून जळगावकडे जाणाऱ्या पुलाचे काम पूर्णत्वास आले व तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्याच बाजूला जळगाववरून भुसावळकडे येणाºया समांतर पुलाचे फाउंडेशनचे काम सुरू झाले आहे. यासाठी वाघूर नदी पात्रात खोदण्यात आलेल्या फाउंडेशनमध्ये निसर्गाचे वेगळे रूप पाहावयास मिळत आहे. नदी पात्रात फाउंडेशन केल्याने ठिकठिकाणी मोठे झरे (झिरे) लागले आहेत. यामुळे झिºयाचे हे पाणी फाउंडेशन बाहेर काढण्यासाठी मोटारीचा उपयोग करण्यात येत आहे.
वाघूर पात्रातून पाण्याचा मार्ग वळविला
यंदा वरुणराजाची कृपादृष्टी असल्यामुळे सातत्याने पाऊस पडत आहे. यामुळे वाघूर पात्रात फाउंडेशनच्या कामात खंड पडत असल्याने महामार्ग चौपदरीकरणाचे कर्मचारी व अधिकारी यांना ज्या ठिकाणी फाउंडेशन करायचे असल्यास त्या ठिकाणी नदी पात्रात फाउंडेशनच्या अवतीभवती मोठा भराव करून व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चक्क नदीपात्रातून नदीच्या प्रवाहाला वेगळी दिशा दिली आहे व कामाला खंड पडू दिला नाही, हे या कामाचे एक वैशिष्ट्य म्हणावे लागणार आहे.