भडगाव शहरात ९ ते १० दिवसाआड होतोय पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 07:07 PM2019-07-29T19:07:30+5:302019-07-29T19:08:38+5:30
भडगाव पालिका हद्दीत ऐन पावसाळ्यात नागरिकांना प्रचंड पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहरात सध्या नऊ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत.
अशोक परदेशी
भडगाव, जि.जळगाव : पालिका हद्दीत ऐन पावसाळ्यात नागरिकांना प्रचंड पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहरात सध्या नऊ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत.
भडगाव शहरासाठी गिरणा नदीवर कच्चा बंधारा बांधण्यात आला आहे. तो सद्य:स्थितीत कोरडा पडला आहे. याशिवाय गिरणा नदीवरील भडगाव शहरासाठी तयार केलेल्या विहिरीही आज खाली आहेत. परिणामी पाणीपुरवठ्याची अडचण वाढली आहे.
भडगाव शहरात भर उन्हाळ्यात गिरणेला पाणी असल्याने नागरिकांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. मात्र पाहिजे तसा पाऊस न झाल्याने टंचाईत वाढ होत जाऊन येथील पाणीपुरवठा आता दहा दिवसाआड केला जात आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात पाणीटंचाईचे सावट हे नागरिकांच्या लक्षात येत नसल्याने, पालिकेविरोधात त्यांच्या संतापात वाढ होत आहे.
पिण्याचे पाणी नसल्याने व पावसाचे पाणी पडत असल्यामुळे शेतातील विहिरीचे पाणी गढूळ व पिण्यास अयोग्य झाले आहे, तर शहरातील अनेक सार्वजनिक हातपंपही बंदच आहेत. शिवाय पिण्यास योग्य पाणी शहरात कुठेही उपलब्ध नसल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे टँकरचे प्रति टँकर मागे १०० रुपये महागले आहे, तर जारच्या पाण्याला जास्त मागणी आल्याने कंपन्या कमी व मागणी जास्त होत आहे. परिणामी मागणी करूनही जारचे पाणी विकत मिळणे कठीण होत आहे. एकंदरीतच, येन दुष्काळात भडगाव पालिका पाणीपुरवठा करण्यात यशस्वी ठरली होती. मात्र पावसाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न सोडविणे कठीण होत आहे.
याबाबत नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पाणी पातळी खोल गेली असून, विहिरीचे काम सुरू आहे. आडवे बोर करत आहोत. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे सांगितले.