अवकाळीचा फटका, शहरात शुक्रवारी झाला नाही पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:45 AM2021-02-20T04:45:37+5:302021-02-20T04:45:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरासह तालुक्यात गुरुवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. वाघूर पंपिंग ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरासह तालुक्यात गुरुवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. वाघूर पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा वादळी पावसामुळे खंडित झाल्याने शहरातील टाक्या भरल्या गेल्या नाहीत. त्यामुळे शुक्रवारी शहरात पाणीपुरवठा झालेला नाही. शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. शुक्रवारचा पाणीपुरवठा आता शनिवारी होणार असल्याची माहिती मनपा पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
गुरुवारी रात्री ८ वाजेनंतर शहर व परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामध्ये वाघूर पंपिंग स्टेशनला वीजपुरवठा करणारी वीज वाहिनी बिघाड झाल्याने पंपिंग स्टेशनवरील वीजपुरवठा रात्री ११ वाजेपासून बंद झाला. यामुळे शहरातील टाक्यामध्ये पाणी भरले गेले नाही. ज्या भागात टाक्या भरल्या गेल्या होत्या. त्या भागातच काही अंशी पाणीपुरवठा होऊ शकला. मात्र, ९० टक्के भागात पाणीपुरवठा होऊ शकला नाही. दरम्यान, सकाळपासून महावितरणकडून पंपिंग स्टेशनवर झालेल्या तांत्रिक बिघाडाची दुरुस्तीचे काम सुरु केले आहे. दुरुस्ती झाल्यानंतर शुक्रवारी ज्या भागात पाणीपुरवठा होणार होता. त्या भागात आता शनिवारी पाणीपुरवठा होणार आहे. तर शनिवारचा पाणीपुरवठा रविवारी होणार असल्याची माहिती मनपा पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.