धरणगाव शहरात बावीस दिवसानंतर पाणीपुरवठा, तोही अशुद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 09:34 PM2021-03-16T21:34:50+5:302021-03-16T21:35:49+5:30
एकतर वीस ते बावीस दिवसांनी पाणी येते आणि तेही गढूळ व अशुध्द त्यामुळे धरणगावातील नागिरकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धरणगाव : शहरात गेल्या वीस ते बावीस दिवसानंतर पाणीपुरवठा झालेला असून अशुद्ध पाणी नळाला येताना दिसून येते. नगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून फिल्टर प्लांट केवळ नावालाच आहे का, असा प्रश्न नागरिक करीत आहेत. हिवाळ्यात वीस ते पंचवीस दिवसानंतर पाणीपुरवठा होत होता. मात्र आता उन्हाळा सुरु झालेला असून आजही हीच परिस्थिती दिसून येते.
एप्रिल-मे महिन्यात तर नळांना पाणीच मिळत नाही, ज्यावेळेस पाऊस पडेल, त्याचवेळेस पाणीपुरवठा होताना दिसून येतो. शुद्ध पाणीपुरवठा होणे आवश्यक असून यात टीसीएल पावडर आम्लाचा वापर नगरपालिकेमार्फत होत नाही. याठिकाणी प्रचंड प्रमाणात दूषित पाणीपुरवठा होत असून नागरिकांत संतापाची लाट उसळत आहे. यात कुणाचा कट झालेला असून सर्दी, खोकला आजारांचे प्रमाण धरणगाव शहरात वाढलेले दिसून येते. त्यात अजून नगरपालिका अशुद्ध पाणीपुरवठा करत आहे. नगरपालिकेने फिल्टर प्लांट बसवला असून तो फक्त शोपीस म्हणून आहे का, असादेखील प्रश्न उपस्थित होत आहे.
पाणी उकळून प्यावे. धावडा येथील पाणीपुरवठा खंडित झालेला असून त्याठिकाणी पाईपलाईन दुरुस्तीचे व गाळ काढण्याचे काम सुरू आहे.
-अनुराधा पाटील, पाणी पुरवठा विभाग, धरणगाव
शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नसून या ठिकाणी आजारी पडण्याचे प्रमाणात प्रचंड वाढ झालेली दिसून येते पाणीपुरवठा नगरपालिकेमार्फत होत असून २० ते २५ दिवसांतून होतो. तोदेखील अशुध्द असल्याने यापुढे जर पाणीपुरवठा अशुद्ध प्रमाणात आला तर भाजपतर्फे आंदोलन करण्यात येईल.
-दिलीप महाजन, शहराध्यक्ष, भाजपा, धरणगाव