नशिराबाद येथे महिन्यातून केवळ 4 दिवस पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 12:29 PM2018-01-02T12:29:43+5:302018-01-02T12:33:47+5:30
जलपातळी खालावली
ऑनलाईन लोकमत
नशिराबाद, जि. जळगाव, दि. 02 - 50 हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा करणा:या जलस्त्रोतांची पातळी आतापासूनच खोलवर गेल्याने ग्रामस्थांना आठवडय़ातून एकच वेळा अर्थात् 6 ते 7 दिवसाआड पाणीपुरवठा व तोही अवेळी होत आहे. सध्या महिन्यातून चारच दिवस पाणीपुरवठा होत असल्याने एप्रील-मे मध्ये पाणी मिळेल की नाही? अशी भीती ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. दरम्यान संभाव्य भीषण पाणी टंचाई लक्षात घेता ग्रामपंचायतीसह आमदार- खासदार, लोकप्रतिनिधी या तहानलेल्या गावाकडे आतातरी लक्ष देणार का? असा संतप्त प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे.
संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कायमस्वरुपी ठोस उपाययोजना व पाण्याचे नियोजन करावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. येथील पाणी टंचाई तशी नवीन नाही मात्र गेल्या 25 वर्षापासून जानेवारी ते पाऊस पडेर्पयत पाणीटंचाईशी ग्रामस्थ- महिलांना झळ बसत असते. प्रत्येक निवडणुकीत पाणी प्रश्नाला प्राधान्य देवू, पाण्यासाठी पैशांची कमी भासू देणार नाही, असे आश्वासन देवून मतांचा जोगवा मागितला जातो. मात्र निवडणुकीनंतर तहानलेल्या ग्रामस्थांची दखलही घेतली जात नाही. या प्रश्नी अद्याप र्पयत ठोस उपाययोजना कार्यान्वित झालेली नाही.
दरम्यान, बेळी व मुर्दापूर धरणालगतसह नशिराबाद पेठच्या जलस्त्रोतातून गावाला पाणीपुरवठा होत आहे. मात्र त्या जलस्त्रोतांची पातळी आतापासूनच खोलवर गेल्याने गेल्या आठवडय़ापासून 6 ते 7 दिवसाआड अवेळी पाणीपुरवठा होत आहे. त्यातच विस्कळीत होणा:या वीजपुरवठय़ामुळे टंचाईत भर पडते.
कायमस्वरुपी स्वतंत्र पाणी योजनाच अद्यापर्पयत कार्यान्वित न झाल्याने दरवर्षी टंचाईला सामोरे जावे लागते. हंडाभर पाण्यासाठी वणवण होते.
गतकाळात एमआयडीसीचे दूषित पाणी घ्यावे लागते होते. पर्यायी योजनाच नसल्याने एमआयडीसीचे थकबाकीमुळे पाणी मिळण्यास अडचणी येते मात्र त्यासाठीही मंत्रालयार्पयत धाव घेत पाणी मिळविले जात होते व टंचाईची झळ कमी होण्यास तात्पुरती मदत होत असे.
दरम्यान,गेल्या दोन वर्षापासून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी वाघूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात येते. यंदाही वाघुरच्या पाण्याचे आवर्तन धरणातून सोडावे, यासाठी नियोजन व्हावे, अशी मागणी होत आहे.
नळांना तोटय़ा बसवा !
ग्रामस्थांनी नळांना तोटय़ा बसवाव्यात असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टळेल, ज्या नळांना तोटय़ा नसतील ते नळ कनेक्शन खंडीत करण्याचा इशारा सरपंचांनी दिला आहे.
ग्रामपंचायतीतर्फे नियोजन सुरु-सरपंच
संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामपंचायतीचे नियोजन सुरु आहे. नशिराबाद येथील द्वारकानगर, मुक्तेश्वरनगर व सावतानगर येथे असलेल्या बोरींगचे पाणी व मूर्दापूर धरणाजवळील बोरींगचे पाणी एकत्रीत करुन पुरवठा गावास करण्याचे नियोजन आहे, त्यामुळे यंदा टंचाईची तीव्रता बसणार नाही, अशी माहिती सरपंच विकास पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. यंदा टंचाईची तीव्रता निवारणार्थ उपाययोजना सुरु आहेत, त्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळेल, असे त्यांनी सांगितले.
जलशुद्धीकरण योजनेचे पाणी कधी?
ग्रामस्थांना मुबलक व शुद्ध पाणी मिळावे यासाठी सुमारे 16 कोटी रुपयांची जलशुद्धीकरण योजनेचे काम प्रलंबित आहे. शेळगाव येथून पाणी येथे आणून शुद्धीकरण करुन गावास पाणीपुरवठा करण्याची योजना आहे. भवानीमाता मंदिराजवळ सुमारे 60 फूट उंचीची भव्य पाण्याची टाकी बांधली आहे. योजनेचे काम पूर्णत्वाकडे असल्याचे सांगण्यात येते, मात्र त्यात पाणी येवून गावास शुद्ध व नियमित पाणीपुरवठा होणार कधी? यंदाही शुद्धीकरणाच्या पाण्यापासून ग्रामस्थ वंचित राहणार का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.