ओझर गावात १५ दिवसाआड पाणीपुरवठा
By admin | Published: February 9, 2017 12:21 AM2017-02-09T00:21:04+5:302017-02-09T00:21:04+5:30
दीड कोटी पाण्यात : निकृष्ट कामाच्या चौकशीची मागणी
चाळीसगाव : तालुक्यातील ओझर येथे पाणीपुरवठा योजनेसाठी १ कोटी ६४ लाख रुपये खर्च करण्यात आले. एवढी मोठी रक्कम खर्चूनही अनेक दिवसांपासून १५-२० दिवसाआड गावाला पाणीपुरवठा केला जात आहे. या पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांची फेब्रुवारी महिन्यापासून पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. पाणीपुरवठा योजनेची चौकशी करावी, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.
यापूर्वी गावात जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत २ ते ३ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. स्वत:ची पेयजल योजना कार्यान्वित झाल्यामुळे मुबलक पाणी मिळेल अशी नागरिकांना आशा होती. परंतु ही योजना पूर्णपणे कुचकामी ठरली आहे. दर्जानुसार काम न होता ठिकठिकाणी पाईप लाईन लिकेज होणे, दूषित पाणी मिळणे या सर्व कारणांमुळे ही योजना ठप्प झाली. कोट्यवधी रुपये खर्चूनही हिवाळ्यानंतर आता उन्हाळ्यातही पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सध्या नदीपात्रात शेवड्या खोदून पाणीपुरवठा करवा लागत आहे. उन्हाळ्यात ही परिस्थिती अधिक तीव्र होणार आहे. याबाबत पाणीपुरवठा योजना अध्यक्ष व सचिव यांच्या कामकाजाची चौकशी करावी व नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.
संबंधित ठेकेदाराने केलेल्या चुकीच्या कामाची ग्रामपंचायतीलादेखील पुरेपूर जाण आहे. परंतु ग्रामपंचायतीने अद्यापही ही पेयजल योजना ताब्यात घेतली नाही. या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी, अशी मागणी मनोज धावजी जाधव, सुदाम सुका खैरे, शांताराम दौलत पगारे यांच्यासह अनेक नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पाण्यासाठी होत असलेली भटकंती थांबवावी व संबंधित कामाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही ओझर ग्रामस्थांकडून निवेदनात देण्यात आला आहे. (वार्ताहर)
पाणीपुरवठा योजनेचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. पाइपाचा दर्जा अतिशय हलका असल्याने सातत्याने ठिकठिकाणी पाणी गळती होते. याचा परिणाम गावाला दूषित पाणीपुरवठा होत आहे. पुन्हा पुन्हा दुरुस्ती करावी लागते. २ कोटी रुपयांची योजना कार्यान्वित असताना नगरपालिकेच्या विहिरीवरून मोठ्या प्रमाणावर रक्कम खर्चून पुन्हा पाईप लाईन टाकण्यात आली. पेयजल योजनेच्या विहिरीवर आडवी बोअर करणे, तसेच गिरणा नदीवर शेवडी खोदकाम करणे असा अनाठायी खर्च ओझर ग्रामपंचायतीतर्फे केला जात आहे. या सर्व खर्चाची चौकशी करावी, अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.