जलवाहिणीच्या दुरुस्तीनंतर पाणी पुरवठा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:45 AM2021-01-08T04:45:50+5:302021-01-08T04:45:50+5:30
जळगाव - वाघूर पाणीपुरवठा योजनेंतर्गत मेहरूणमधील गोसावी मळा याठिकाणची १२०० मिमी व्यासाची जलवाहिनी सोमवारी फुटली होती. या जलवाहिणीच्या ...
जळगाव - वाघूर पाणीपुरवठा योजनेंतर्गत मेहरूणमधील गोसावी मळा याठिकाणची १२०० मिमी व्यासाची जलवाहिनी सोमवारी फुटली
होती. या जलवाहिणीच्या दुरुस्तीचे काम सोमवारपासून हाती घेण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी ११ पर्यंत दुरुस्तीचे काम पुर्ण झाल्यामुळे बुधवारी शहरात सुरळीत पाणी पुरवठा होणार आहे. दुरुस्तीनंतर दुपारी १ वाजेनंतर टाक्यांमध्ये पाणी सोडण्यात आले. तसेच चाचणी देखील करण्यात आली. बुधवारी सुरळीत पाणी पुरवठा होणार असून, काही भागात अर्धा तास उशीरानेही पाणी पुरवठा होवू शकतो अशी माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
प्रभाग समिती सदस्यांचा सन्मान
जळगाव-कोरोनाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता प्रभागातील नागरिकांच्या मदतीस धावून जाणाऱ्या प्रभाग समिती सदस्यांचा महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रभाग समिती सदस्य रवींद्र (बंटी) नेरपगारे व विठ्ठल पाटील यांना कोरोना कोरोना यौध्दा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी ॲड. शुचिता हाडा, नगरसेविका प्रतिभा पाटील, सुरेखा तायडे, स्वच्छ भारत अभियान समन्वयक महेंद्र पवार आदी उपस्थित होते.
प्लास्टिक विक्री करणाऱ्या चार दुकानदारांना दंड
जळगाव - प्लास्टीक तसेच थर्माकॉल उत्पादनांवर बंदी असतानाही शहरात अनेक ठिकाणी प्लास्टीकचा सर्रास वापर होत आहे. मंगळवारी मनपा आरोग्य अधिकारी पवन पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरातील दुकानांमध्ये अचानकपणे जावून तपासणी केली असता, चार दुकानांमध्ये प्लास्टीकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या असून, चारही दुकानांच्या मालकांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामध्ये विजय कलेक्शन, नरेंद्र द मॉल, छाया कलेक्शन व मनोहर शुजचा समावेश आहे. आरोग्य अधिकाऱ्यांसोबत आरोग्य अधीक्षक शरद बडगुजर, संजय अत्तरदे, लीपीक भगीरथ सरसीया, दिलीप बाविस्कर, मोहन जाधव यांचा या पथकात समावेश होता.
शिवसेनातर्फे शासकीय योजना शिबीर
जळगाव - शिवसेना महानगर तर्फे प्रभाग ५ मध्ये मंगळवारी अल्प दरात सर्व शासकीय योजना शिबिराचे उद्घाटन जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. विभागप्रमुख प्रशांत सुरळकर यांच्या पुढाकाराने हे शिबीर घेण्यात आले. यावेळी याप्रसंगी शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, महिला महानगर प्रमुख शोभा चौधरी ,मंगला बारी, सरिता कोल्हे, निलु इंगळे, कडू चौधरी, दीपक मराठे, कुंदन चौधरी, नारायण चौधरी, प्रल्हाद पाटील आदी उपस्थित होते. या शिबिरात १० जानेवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे .
अतिक्रमण कारवाईदरम्यान पळापळ
जळगाव - मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाकडून मंगळवारी बळीराम पेठ, सुभाष चौक, गणेश कॉलनी चौक परिसरात कारवाई करण्यात आली. मनपाच्या पथकाने अचानक केलेल्या कारवाईमुळे हॉकर्स व रस्त्यावरील विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांनी धावपळ केल्याने सुभाष चौक भागात गोंधळ उडाला होता. याठिकाणी २२ हॉकर्सचा माल जप्त करण्यात आला आहे. यासह ख्वॉजामिया चौक परिसरात देखील मनपाकडून कारवाई करून माल जप्त करण्यात आला.