जळगाव औद्योगिक वसाहतीला रविवारपासून नवीन जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 11:56 AM2018-05-17T11:56:28+5:302018-05-17T11:56:28+5:30
काम पूर्ण
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १७ - औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असून रविवारपासून नवीन जलवाहिनीद्वारे औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा केला जाणार आहे. यामुळे वारंवार होणाºया गळतीची समस्या मार्गी लागणार असून शिवाय नवीन तंत्रज्ञानाच्या जलवाहिनीमुळे कमी वेळात जास्त दाबाने पाणीपुरवठा होण्यास मदत मिळणार आहे.
जळगाव औद्योगिक वसाहतीला साकेगाव येथून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी १९८४मध्ये महामार्गाच्या बाजूने जलवाहिनी टाकण्यात आलेली आहे. ही जलवाहिनी उघड्यावर असल्याने ती वारंवार फुटण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यात ती कालबाह्य झाली आहे. त्यामुळे नवीन जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला व त्यानुसार हे काम हाती घेऊन ते आता पूर्ण झाले आहे.
चाचणीमध्ये आढळल्या दोन ठिकाणी गळती
जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर औद्योगिक महामंडळाच्यावतीने नवीन जलवाहिनीच्या कामाची मंगळवारी चाचणी घेण्यात आली. यामध्ये नशिराबाद व महामार्गावरील सिमेंट कंपनीनजीक अशा दोन ठिकाणी गळती आढळून आली. त्यामुळे हे गळती दूर करण्याचे काम गुरुवारी करण्यात येणार आहे.
शनिवारपासून जुनी जलवाहिनी बंद होणार
नवीन जलवाहिनीचे काम झाल्याने आता किरकोळ अडचणी दूर करण्यात आल्यानंतर शनिवारपासून जुन्या जलवाहिनीद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असल्याची माहिती औद्योगिक महामंडळाच्यावतीने देण्यात आली. शनिवारी औद्योगिक वसाहत बंद राहते, त्यामुळे कंपन्यांनाही अडचणी येऊ नये व कामही एकाच दिवसात पूर्ण व्हावे, यासाठी शनिवारी हे काम हाती घेऊन नवीन जलवाहिनीची जोडणी केली जाणार आहे.
हजारो लिटर पाण्याची होत असे नासाडी
३४ वर्षांपूर्वी टाकण्यात आलेल्या जलवाहिनीस गंज लागल्याने तिला वारंवार गळती लागत होती. सोबतच ती महामार्गाला लागून असल्याने ती फोडलीदेखील जात असल्याची चर्चा होत असे. त्यामुळे गळती लागून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असे.
नवीन भूमिगत जलवाहिनीचा पर्याय
सध्या उघढ्यावर असलेली जलवाहिनी वारंवार फुटत असल्याचा अनुभव पाहता नवीन जलवाहिनी टाकताना ती भूमिगत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे साकेगाव ते जळगाव औद्योगिक वसाहतीपर्यंत भूमिगत जलवाहिनी टाकण्यात आली आहे.
१२ कि.मी.चे काम पूर्ण
साकेगाव ते औद्योगिक वसाहतीपर्यंत १६ कि.मी. लांब ही जलवाहिनी असून त्यापैकी महामार्गानजीकचे प्रमुख १२ कि.मी. जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. तापी नदीपात्रात चार कि.मी.चे काम बाकी असून त्यातही अडीच कि.मी. नवीन जलवाहिनी टाकण्यात आली असून पुढील आठवड्यात तीदेखील जोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर
नवीन जलवाहिनी टाकताना ती भूमिगत तर टाकण्यात आली आहे, सोबतच नवीन तंत्रज्ञानाचे पाईप यासाठी वापरले आहे. जुनी जलवाहिनी लोखंडी आहे तर नवीन पाईप हे डीआयचे (डक्टाईल आयर्न) टाकण्यात आले आहेत. यामुळे पाणी अत्यंत गुळगळीतपणे (सॉफ्ट) व कमी वेळात जास्त दाबाने पोहचू शकेल, असे अधिकाºयांचे म्हणणे आहे. पूर्वीप्रमाणेच पाईप ७०० मिमी व्यासाचे आहेत.
औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असून त्याची चाचणीही घेण्यात आली. दोन ठिकणी गळती आढळल्या असून त्या काढण्यात येऊन रविवारपासून नवीन जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.
- पी.पी.पाटील, उप अभियंता, औद्योगिक विकास महामंडळ.