वेल्हाळे तलावावरून होणार पाणीपुरवठा
By admin | Published: February 23, 2017 01:13 AM2017-02-23T01:13:39+5:302017-02-23T01:13:39+5:30
यावर्षी पाणीटंचाईची तीव्रता कमी : भुसावळ तालुक्यातील केवळ सहा गावांना संभाव्य टंचाई
भुसावळ : गेल्या वर्षी सर्वत्र परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे जमिनीतील पाणीपातळी टिकून आहे. त्याचा परिणाम म्हणून यावर्षी भुसावळ तालुक्यातील पाणीटंचाई खूपच कमी झाली आहे.
येथील पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने जि.प.कडे सादर केलेल्या कृती आराखड्यात केवळ सहाच गावांना संभाव्य पाणीटंचाई जाणवणार असल्याचे म्हटले आहे. सात लाख ५० हजार रुपये अंदाजित खर्चाच्या कृती आराखड्यास मंजुरी मिळाल्यानंतर टंचाई निवारण्याची कामे हाती घेण्यात येतील, असे संबंधित विभागाच्या सूत्रांनी ‘लोकमत’ला माहिती देताना सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत खंडाळे आणि शिंदी या दोन गावांना वेल्हाळे येथील तलावावरून पाणीपुरवठा करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. ती मंजुरीसाठी मंत्रालयात पाठवण्यात आली असल्याची माहिती पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता एस. पी. लोखंडे यांनी दिली.
मागणी आल्यास टँकरचा वापर
दरम्यान, गेल्या वर्षी चांगले पर्जन्यमान झाले, त्यामुळे भुसावळ तालुक्यातील केवळ सहा गावांचा कृती आराखड्यात समावेश करण्यात आला आहे.
यात खेडी, चोरवड, शिंदी, टाहाकळी, कंडारी, साकरीफाटा या सहा गावांचा कृती आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, महादेवमाळ, कंडारी आणि साकरी फाटा या गावांकडून पाण्याची मागणी करण्यात आल्यास या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
३६ वरून सहा गावे
दरम्यान, गेल्या वर्षी व त्याच्या आधीदेखील भुसावळ तालुका टंचाई कृती आराखड्यात सुमारे ३६ गावांचा समावेश असायचा. अनेक ठिकाणी उन्हाळ्यात पाणीटंचाईची स्थिती गंभीर व्हायची. यात दरवेळी कंडारी आणि साकरीफाटा परिसराला कायम स्वरुपी पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. मात्र, पाऊस झाल्याने टंचाईची तीव्रता कमी झाली आहे, असे सूत्रांनी सांगितले.(प्रतिनिधी)
यावर्षी प्रथमच मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत भुसावळ तालुक्यातील खंडाळे आणि शिंदी या दोन गावांना योजनेंतर्गत पाणीपुरवठा केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंत्रालयात पाठवण्यात आला आहे.
४ या योजनेंतर्गत भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे येथील तलावाच्या काठावर दोन ठिकाणी विहिरी खोदण्यात येणार आहेत. त्यातून पीव्हीसी पाईपलाईन टाकून या दोन गावांमधील विहिरीत पाणी सोडून ते गावांना पुरवण्याची योजना तयार करण्यात आली आहे.
भुसावळ तालुक्यातील खंडाळे व शिंदी या गावांसाठीची मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेचा प्रस्ताव मुंबई मंत्रालयात सादर झाला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर लागलीच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. ही योजना महत्त्वाकांक्षी आहे. वेल्हाळे ते खंडाळे आणि शिंदी या गावांना पीव्हीसी पाईपलाईन वेल्हाळे तलाव ते शिंदी व खंडाळे अशी या क्रॉस कंट्री पद्धतीने पाईपलाईन अंथरून या दोन गावांना पाणीपुरवठा करण्याची मोठी योजना आहे.
वेल्हाळे तलावावरून शिंदी या सुमारे २००० हजार लोकसंख्येच्या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठीची मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना ही सुमारे ७६ लाख रुपये इतक्या खर्चाची आहे.यात तलावाजवळ विहीर आणि विहिरीपासून गावापर्यंत पीव्हीसी पाईपलाईन अंथरून त्याद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेत भुसावळ तालुक्यातील खंडाळे या गावाचाही समावेश करण्यात आला आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे १ हजार २०० इतकी आहे. या गावातील पाण्याच्या टाकीत वेल्हाळे तलावावरून पीव्हीसी पाईपलाईनद्वारे पाणी वाहून आणून त्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. खंडाळे गावासाठीची ही योजना ६४ लाख रुपये इतक्या किमतीची असल्याची माहिती अधिकृत शासकीय सूत्रांनी दिली आहे.