झंवरच्या अटकेमुळे वॉटरग्रेसची फाइल होणार ओपन ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:19 AM2021-08-12T04:19:13+5:302021-08-12T04:19:13+5:30

अजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बीएचआर प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवर याला नाशिक मधून अटक केल्यानंतर बीएचआर ...

Watergrass file to be opened due to Zanwar's arrest? | झंवरच्या अटकेमुळे वॉटरग्रेसची फाइल होणार ओपन ?

झंवरच्या अटकेमुळे वॉटरग्रेसची फाइल होणार ओपन ?

Next

अजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : बीएचआर प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवर याला नाशिक मधून अटक केल्यानंतर बीएचआर प्रकरणासह मनपातील वॉटरग्रेसची फाइलदेखील ओपन होण्याची शक्यता आहे. बीएचआर प्रकरणात सुनील झंवर यांचे नाव आल्यानंतर पोलिसांनी झंवर यांच्या कार्यालयाची तपासणी केली असता, त्याठिकाणी वॉटरग्रेसची कागदपत्रे व काही चिठ्ठ्या आढळून आल्या होत्या. त्यामध्ये काही शॉर्ट नावे आढळून आली होती. मात्र, या प्रकरणी फारशी चौकशी झालेली नव्हती. मात्र, आता झंवरच्या अटकेनंतर वॉटरग्रेसमधील लपलेल्या काही बाबींचाही उलगडा होण्याची शक्यता आहे.

मनपाच्या दैनंदिन साफसफाईचे काम करत असलेल्या वॉटरग्रेस कंपनीचे काम मनपा प्रशासनाने फेब्रुवारी २०२० मध्ये थांबवले होते. मात्र, कायदेशीर अडचणींचे कारण देत मनपा प्रशासनाने जुलै २०२० पासून वॉटरग्रेसला शहराच्या सफाईचे काम पुन्हा देण्यात आले होते. तसेच नव्याने संधी देताना मनपातील तत्कालीन सत्ताधारी व विरोधकांनीदेखील मनपाच्या निर्णयाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर डिसेंबर २०२० मध्ये पोलिसांनी बीएचआर प्रकरणी झंवर यांच्या कार्यालयाची तपासणी केली असता, यामध्ये वॉटरग्रेसच्या ठेक्यातील काही महत्त्वाचे कागदपत्रे आढळून आले होते. तसेच काही नगरसेवकांची शॉर्ट नावांची यादी व त्या समोर काही आकडेदेखील आढळून आले होते. झंवर यांच्या अटकेमुळे पुन्हा या प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे.

पोट करारीचीही होणार चौकशी ?

वॉटरग्रेसमध्ये सुनील झंवर यांचाही हिस्सा असल्याचे सांगितले जात होते. या प्रकरणी वॉटरग्रेस कंपनीने मनपाची परवानगी न घेताच झंवर यांना यांच्याशी करार करून, हे काम झंवर यांना दिल्याचेही सांगितले जात आहे. याप्रकरणी मनपा प्रशासनाने युनियन बँकेला नोटीस बजावून याप्रकरणी चौकशी केली होती. वॉटरग्रेसचे व्यवहार असलेल्या युनियन बँकेनेदेखील सुनील झंवर यांना पॉवर ऑफ ॲटर्नी करून दिल्याचे मनपाला कळवले होते. झंवर व वॉटर ग्रेसचा काहीही संबंध नसताना पॉवर ऑफ ॲटर्नी करून देणे याचा अर्थ वेगवेगळा काढला जात आहे. दरम्यान, आता झंवरला अटक झाल्यामुळे वॉटरग्रेसमध्ये झंवर यांच्या साई मार्केटिंगचाही संबंधदेखील आता तपासला जाणार आहे.

‘त्या’ चिठ्ठीतील सस्पेंन्स उघडणार ?

भाजप व मनपातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्यात झंवर यांच्या कार्यालयातून वॉटरग्रेसबाबत एक चिठ्ठी पोलिसांना मिळाली होती. यामध्ये काही शॉर्टमध्ये नावे आहेत व त्या नावांपुढे काही आकडे आहेत. सुमारे ४५ ते ६० नावे असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, पोलिसांकडून याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या चिठ्ठीबाबत मात्र मनपाच्या राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू आहेत. आता झंवरच्या अटकेमुळे ‘त्या’ चिठ्ठीतील सस्पेन्स समोर येण्याची शक्यता.

Web Title: Watergrass file to be opened due to Zanwar's arrest?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.