वॉटरग्रेसने करारनाम्याचा भंग केला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:37 AM2021-01-13T04:37:21+5:302021-01-13T04:37:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहराचा दैनंदिन सफाईचे काम करत असलेल्या वॉटरग्रेस कंपनीने साई मार्केटींगचे संचालक सुनील झंवर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहराचा दैनंदिन सफाईचे काम करत असलेल्या वॉटरग्रेस कंपनीने साई मार्केटींगचे संचालक सुनील झंवर च्या माध्यमातून सफाई ठेक्याचे संचलन केले असले किंवा बँकेच्या खात्याचा वापरासाठी पॉवर ऑफ अॅटर्नी केले असले तरी करारनाम्याचा भंग होत नसल्याचा अभिप्राय मनपाच्या उच्चन्यायालयातील वकिलांनी मनपा प्रशासनाकडे सादर केला आहे. उपठेका दिल्याबाबत मनपाकडे त्यांच्यातील करारनामा नाही. तसेच बँकेचे खाते हाताळण्याचे अधिकार झंवर यांना दिले असले तरी यामुळे अटी व शर्थींचा भंग होत नसल्याने उच्च न्यायालयाच्या वकिलांनी वॉटरग्रेसला एकप्रकारे दिलासाच दिला आहे.
वॉटरग्रेस कंपनीने साई मार्केटींगला पोटठेका दिल्याचा विषय पुढे येत असल्याने मनपाने पॉवर ऑफ अॅटर्नीबाबत आपल्या विधी अधिकाऱ्यांकडे अभिप्राय मागितला होता. मात्र, वॉटरग्रेस कंपनीने या आधीच मार्च महिन्यात मनपाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केले आहेत. त्यामुळे याबाबतीत थेट उच्च न्यायालयाच्या वकिलांचा अभिप्राय घेण्याचा सल्ला दिला. मनपाच्या विधी अधिकाऱ्यांनी दिला होता. त्यानुसार गुरुवारी मनपा प्रशासनाने आगामी काळात उच्च न्यायालयात दावा चालण्याची शक्यता लक्षात घेता वॉटरग्रेसबाबत उच्च न्यायालयातील मनपाच्या वकिलांचा सल्ला मागविला होता. त्यात वकिलांनी मनपाकडे आपला लेखी अभिप्राय पाठविला. वॉटरग्रेसचे व्यवहार असलेल्या युनियन बँकेने सुनील झंवर यांना पॉवर ऑफ अॅटर्नी करून दिले असले तरी यामुळे करारनाम्याचा कुठलाही भंग होत नसल्याचे वकिलांनी म्हटले आहे. तसेच वॉटरग्रेस ने पोटठेका दिल्याचेही यामुळे स्पष्ट होत नाही असेही म्हटले आहे. दरम्यान, उच्चन्यायालयातील वकिलांचा अभिप्रायानुसार वॉटरग्रेस कंपनीला दिलासा मिळताना दिसून येत आहे. मात्र, यानंतर मनपा प्रशासन व पदाधिकाऱ्यांची काय भूमिका राहते याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.