पाण्याअभावी लावलेली रोपे मरणाला ‘टेकली’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:15 AM2021-04-17T04:15:01+5:302021-04-17T04:15:01+5:30
मेहरून तलाव : मनपाच्या दुर्लक्षामुळे झाडांची होतेय दिवसाढवळ्या कत्तल लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या दोन वर्षांपूर्वी मेहरुन तलावाभोवती ...
मेहरून तलाव : मनपाच्या दुर्लक्षामुळे झाडांची होतेय दिवसाढवळ्या कत्तल
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या दोन वर्षांपूर्वी मेहरुन तलावाभोवती मनपाने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केलेली रोपे सध्या पाण्याअभावी पूर्णपणे कोमेजून मरणावस्थेला आली आहेत, तर दुसरीकडे मनपाकडून सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर कुठलीही देखभाल करण्यात येत नसल्याने नागरिकांकडून दिवसाढवळ्या झाडांची कत्तल होत आहे. त्यामुळे मेहरुन तलावाच्या अस्तित्वासाठी मनपाने लक्ष देण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी मेहरुन तलावाभोवती ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली होती. तत्कालीन महापौर भारती सोनवणे यांनी या झाडांना पाणी देण्यासाठी एका मक्तेदाराची नियुक्तीही केली होती. त्यामुळे गेल्या वर्षी संबंधित मक्तेदारातर्फे उन्हाळ्यात नियमित या रोपांना पाणी देऊन ही रोपे जगविण्यात आली. मात्र, यंदा संबंधित मक्तेदारातर्फे कुठल्याही प्रकारचे पाणी अथवा उपाययोजना करण्यात येत नसल्यामुळे ही झाडे यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याअभावी वाळत आहेत. त्यामुळे वृक्षारोपण करण्यात आलेल्या झाडांचा उपयोग काय, असा प्रश्न नागरिकांतर्फे उपस्थित करण्यात येत असून, मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
इन्फो :
झाडांचीही दिवसाढवळ्या कत्तल
या परिसरात नागरिक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी येत असतात. त्यामुळे झाडांची कत्तल होत असल्याचा प्रकार दिसल्यावर तात्काळ अडविले जाते. मात्र, सध्या उन्हाळा आणि त्यात कोरोनाचे निर्बंध असल्याने नागरिक दुपारनंतर घराबाहेर निघणे टाळतात. नेमक्या याच संधीचा फायदा घेत काही नागरिक मेहरुन तलावाभोवती असलेली झाडे तोडत असल्याचे प्रकार परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास येत आहेत. तसेच काही नागरिक झाडांच्या मधोमध कुऱ्हाडीने घाव घालून, झाडांना खड्डे पाडत असल्याने ही झाडे आपोआप काही दिवसांनी पूर्णपणे वाळत आहेत. त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
इन्फो :
गेल्या वर्षी मनपाने नियुक्त केलेल्या ठेकेदाराने तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार नियमितपणे रोपांना पाणी देऊन झाडे जगवली. मात्र, यंदा या ठेकेदाराने झाडांना पाणी देण्याबाबत कुठलीही व्यवस्था न केल्यामुळे झाडे वाळत आहेत. तसेच दुसरीकडे मनपाच्या दुर्लक्षामुळे काही नागरिक झाडेही तोडण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे शहराचे हे वैभव टिकण्यासाठी मनपाने लक्ष देणे गरजेचे आहे.
विजय वाणी, सचिव, मराठी प्रतिष्ठान
इन्फो :
ठेकेदार प्रतिसाद देईना
‘लोकमत’ प्रतिनिधीने गेल्या वर्षी या रोपांना नियमित पाणी दिलेल्या ठेकेदाराशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आता लोकप्रतिनिधींनी मेहरुन तलावाच्या संवर्धनाबाबत लक्ष देण्याची मागणी परिसरातील रहिवासी व पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.