पाझर तलाव आटल्याने जुचंद्रमध्ये पाणीबाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 02:02 AM2020-06-24T02:02:14+5:302020-06-24T02:02:21+5:30
मे महिन्यात पाझर तलावात १५ ते २० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे जूनमध्ये पाऊस लांबणीवर पडल्यास जुचंद्रवर पाणीसंकट कोसळण्याची शक्यता आहे.
पारोळ : जुचंद्रकरांची तहान भागवणारा पाझर तलाव यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आटल्याने ग्रामस्थांचे पाण्यावाचून हाल होण्याची शक्यता आहे. जुचंद्र परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून पाझर तलाव हा एकमेव जलस्रोत पाणीपुरवठ्याबाबत अपुरा पडू लागला आहे. मे महिन्यात पाझर तलावात १५ ते २० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे जूनमध्ये पाऊस लांबणीवर पडल्यास जुचंद्रवर पाणीसंकट कोसळण्याची शक्यता आहे.
जूनच्या सुरूवातीला निसर्ग वादळामुळे दोन दिवस पावसाने हजेरी लावली; मात्र त्यानंतर पावसाने आजतागायत दडी मारल्याने पाझर तलाव आटले आहे. जुचंद्रचे पाझर तलाव आटल्याने जुचंद्र, वाकीपाडा, चंद्रपाडा परिसराला पाण्यावाचून हालअपेष्टा सोसाव्या लागणार आहे. पाझर तलाव आटल्याने त्यातून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. तर जुचंद्र परिसराला सूर्या-धामणी आाण पेल्हार धरणातून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
>कमी दाबाने मिळणार पाणी
जुचंद्र परिसराला सूर्या-धामणी आाण पेल्हार धरणातून पाणी पुरवठा करण्यात येणार असला तरी दोन्ही धरणातून होणारा पाणीपुरवठा अनियमित दराने आणि कमी दाबाने होणार आहे.
तसेच चंद्रपाडा वा वाकीपाडा येथील पाण्याच्या टाकीत काही दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. यादरम्यान पाऊस झाला नाही तर चंद्रपाडा, वाकीपाडा या भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.