जिल्ह्यात म्युकरमायकोसिस परतीच्या मार्गाला; दोन जणांचे डोळे काढावे लागले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:21 AM2021-06-16T04:21:06+5:302021-06-16T04:21:06+5:30

स्टार ८१० लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोविडनंतर आता म्युकरमायकोसिसचे रुग्णदेखील कमी होत असून १०० वर रुग्णसंख्या पोहोचली असली ...

On the way back to mucorrhoea in the district; Two people had to take their eyes off! | जिल्ह्यात म्युकरमायकोसिस परतीच्या मार्गाला; दोन जणांचे डोळे काढावे लागले !

जिल्ह्यात म्युकरमायकोसिस परतीच्या मार्गाला; दोन जणांचे डोळे काढावे लागले !

Next

स्टार ८१०

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोविडनंतर आता म्युकरमायकोसिसचे रुग्णदेखील कमी होत असून १०० वर रुग्णसंख्या पोहोचली असली तरी सध्या ६८ जणांवर उपचार सुरू आहेत. दोन जणांचे डोळे यामुळे काढावे लागले असून १५ जणांवर जबड्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसमुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी ज्यांची प्रतिकारक्षमता कमी आहे त्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. विशेषत: घरात बुरशी होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोनानंतर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्णदेखील समोर येऊ लागले. सध्या ही संख्या कमी होत असल्याने दिलासा आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत बुरशीजन्य आजाराचे निदान केले जात आहे. येथून निदान झाल्यानंतरच शस्त्रक्रिया किंवा औषधोपचाराबाबत डॉक्टर निर्णय घेत असतात. सध्या पावसाळा सुरू होत असल्याने अशा स्थितीत हे रुग्ण वाढण्याची शक्यतादेखील वर्तविली आहे.

६८ जणांवर उपचार सुरू

जिल्हाभरात म्युकरमायकोसिसच्या १०० रुग्णांची शासकीय पातळीवर नोंद करण्यात आली. यातील ५७ रुग्ण हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील असून सध्या येथे २९ जणांवर उपचार सुरू आहेत. येथे पाच रुग्णांवर जबड्याची शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. यातील एका महिलेच्या मेंदूपर्यंत संसर्ग पोहोचल्याची शंका असल्याने त्या दृष्टीने डॉक्टरांनी तपासणी केली. यासोबतच डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ४३ रुग्णांची नोंद असून सध्या ३९ जणांवर उपचार सुरू आहेत. तेथे १० रुग्णांवर जबड्याची शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे.

मृत्यू - ९

दोन जणांचा डोळा निकामी

जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसच्या जबड्याच्या शस्त्रक्रिया अधिक झाल्या आहेत. ही संख्या १५ असली तरी डोळ्यांवर गंभीर बाधा झालेल्यांची संख्या कमी आहे. जिल्ह्यातील दोन जणांचा एक-एक डोळा काढाला लागला आहे. सध्या हे रुग्ण डोळ्यांच्या डॉक्टरांकडे उपचार घेत आहेत.

औषधींचा भरपूर साठा

म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी लागणारे एम्फोटेरीसीन बी ४१६ इंजेक्शन जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. काही दिवसांपासून याचा तुटवडा जाणवत होता. गेल्या आठवड्यातच दोनच वेळा हे इंजेक्शन मिळाले होते. सद्यस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तसेच डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयालाच या इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. या ठिकाणी ६८ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यानुसार आलेल्या ४१६ इंजेक्शनपैकी जीएमसीला २७२ तर डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाला १४४ इंजेक्शन देण्यात आले.

प्राथमिक लक्षणे

डोळ्याखाली सूज येणे, डोळा बधीर होणे

नाकाच्या खाली सूज येणे

डोळ्याची हालचाल मंदावणे

डोळे दुखणे, दात दुखणे

टाळूजवळ काळे डाग पडणे

गंभीर स्थिती उद्भवल्यास डोळा बंद होतो

ही घ्या काळजी

बुरशीला दमट वातावरण पोषक असते. त्यामुळे तिचा संसर्ग होण्याचे प्रमाण या काळात वाढते. प्रतिकारक्षमता कमी असलेल्यांना म्युकरमायकोसिसची लवकर लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे घरात ओलाव्यावर बुरशी होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच घरात हवा खेळती असावी, मास्कचा नेहमी वापर करावा, कोविड झालेल्यांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

- डॉ. धर्मेंद्र पाटील, नेत्ररोग तज्ज्ञ

म्युकरमायकोसिसपासून बरे झाल्यानंतर घरी गेल्यावरदेखील काळजी घेणे महत्त्वाचे आहे. मधुमेह सामान्य राहील याकडे लक्ष द्यावे, इतर व्याधी होणार नाही याविषयी दक्षता घ्यावी. लवकर उपचार घेऊन स्वत:चा बचाव करता येऊ शकतो.

- डॉ. एन.एस.चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक.

Web Title: On the way back to mucorrhoea in the district; Two people had to take their eyes off!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.