मन्याड धरणाची साठीकडे वाटचाल; गिरणा ४५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:20 AM2021-08-22T04:20:20+5:302021-08-22T04:20:20+5:30

पुढील काही दिवसांत मन्याड परिसरात एक-दोन दमदार पाऊस झाल्यास लवकरच मन्याड १०० टक्के भरून हॅट्ट्रिक करील, असे गिरणा पाटबंधारे ...

On the way to Manyad Dam; Mill 45 percent | मन्याड धरणाची साठीकडे वाटचाल; गिरणा ४५ टक्के

मन्याड धरणाची साठीकडे वाटचाल; गिरणा ४५ टक्के

googlenewsNext

पुढील काही दिवसांत मन्याड परिसरात एक-दोन दमदार पाऊस झाल्यास लवकरच मन्याड १०० टक्के भरून हॅट्ट्रिक करील, असे गिरणा पाटबंधारे विभागाचे, चाळीसगाव येथील उपअभियंता हेमंत व्ही. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सलग दुसऱ्यांदा मन्याड १०० टक्के भरले होते. यावर्षी लेटलतीफ पावसामुळे एक महिना उशिरा भरेल असे वाटत आहे. सन २०१९ मध्ये ऑक्टोबरमध्ये मन्याड १०० टक्के भरले होते. सन २०२०च्या ऑगस्टमध्ये १०० टक्के भरले होते.

यावर्षी २०२१मध्ये सप्टेंबरमध्ये धरण १०० टक्के भरण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण चार-पाच दिवसांपूर्वी ३५ टक्क्यांवर असलेले मन्याड धरण चार- पाच दिवसांतच ५५ टक्के झाल्याने रविवारपर्यंत ६० टक्के होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

माणिकपुंज शुक्रवारी शंभर टक्के भरून ओसंडून वाहू लागल्याने मन्याड परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कारण माणिकपुंजमधील पाण्याचा विसर्ग मन्याड धरणात येत असल्याने त्याचा फायदा मन्याड धरण भरण्यासाठी होतो. याशिवाय धरणाच्या लाभक्षेत्रात मन्याड खोऱ्यातील नारळा-पारळा भागात दमदार पाऊस झाल्याने शुक्रवारी माणिकपुंज ओसंडून वाहू लागल्याने लाभक्षेत्रातील जळगाव बुद्रुक, जळगाव खुर्द, पिंपरखेड आदी भागांतील शेतकरी आनंदी झाले आहेत.

मन्याड धरणावर विसंबून असणारी गावे

काकळणे, मंगळणे, नांद्रे, अलवाडी, देशमुखवाडी, तळोंदा, पिंप्री, शिरसगाव, ब्राम्हणशेवगे, माळशेवगे, पिंपळवाड निकुंभ, सायगाव, टाकळी, पिंपळवाड म्हाळसा, आडगाव, उंबरखेड, देवळी, चिंचखेडे, दडपिंप्री, डोणपिंप्री, इत्यादी गावांचा सिंचनाचा व काही गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मन्याड धरणामुळे सुटतो. धरण सलग तिसऱ्या वर्षी हॅट्ट्रिक करीत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून मन्याडसह गिरणा धरणदेखील १०० टक्के भरत आल्याने दोन वर्षांपासून सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न चांगल्या प्रकारे मार्गी लागला आहे. यावर्षीदेखील दोन्ही धरणे हॅट्ट्रिक करतील, अशी अपेक्षा आहे. कारण येणारा पुढील पाऊस चांगला आहे. त्यामुळे लवकरच मन्याड व गिरणा धरण १०० टक्के भरेल. मन्याड परिसरात एक-दोन दमदार पाऊस झाल्यास मन्याड लवकरच १०० टक्के भरेल. त्यानंतर गिरणादेखील भरेल. सलग तीन वर्षे दोन्ही धरणांनी साथ दिल्यास गिरणा व मन्याड परिसरातील शेतकऱ्यांना पुढील रबी हंगाम चांगला घेता येईल व पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटेल.

-हेमंत व्ही. पाटील

उपअभियंता गिरणा पाटबंधारे विभाग

चाळीसगाव

मन्याड सलग तिसऱ्या वर्षी हॅट्ट्रिक करीत असल्याने मन्याड परिसरातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. कारण या परिसरातील नागरिकांचे जीवन मन्याड धरणावर अवलंबून आहे. धरण भरले तरच रबी हंगाम घेता येतो. धरण भरले नाही तर रबी हंगामाचे तर सोडाच; गुरांना चारा व पाणीदेखील उपलब्ध होत नाही. आज मन्याड साठी पार करून लवकरच शंभरी पार करील, अशी अपेक्षा करूया.

-सुभाष जुलाल पाटील, प्रगतिशील शेतकरी, पिंप्री, ता. चाळीसगाव

गेल्या वर्षी सलग दुसऱ्यांदा मन्याड शंभर टक्के भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी चांगल्याप्रकारे रबी हंगाम हाती घेतला. यावर्षीदेखील मन्याडविषयी चांगली वार्ता कानावर येत असल्याने असंख्य शेतकऱ्यांनी आतापासूनच आनंद साजरा करायला सुरुवात केली आहे.

-विशाल भगवान पाटील,

शेतकरी, देवळी, ता. चाळीसगाव

Web Title: On the way to Manyad Dam; Mill 45 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.