जामनेर येथील प्रिया नाहाटा वैराग्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 11:10 PM2019-12-20T23:10:30+5:302019-12-20T23:12:09+5:30
जामनेर येथील २७ वर्षीय कन्या प्रिया नाहाटा ही ३१ डिसेंबर रोजी नाशिक येथे जैनधर्माची दीक्षा घेत आहे.
वाकोद/जामनेर, जि.जळगाव : जामनेर येथील व्यापारी सुभाषचंद तथा पुष्पा नाहाटा यांची २७ वर्षीय कन्या प्रिया नाहाटा ही ३१ डिसेंबर रोजी नाशिक येथे जैनधर्माची दीक्षा घेत आहे. तत्पूर्वी दीक्षार्थी प्रिया नाहाटा हिचा शेकडो जैन बांधवांच्या उपस्थितीत जामनेर येथे गुरुवारी भव्य वरघोडा (मिरवणूक) काढण्यात आला.
प्रिया नाहाटा ही शिक्षित असून इंटेरीअर डेकोरेटर पदवी प्राप्त केली आहे. वयाच्या १३ तोव्या वर्षापासून जैन साधू-संतांच्या सहवासात आहे. २०१२ मध्ये प. पू. सरिताश्री म. सा. यांच्या चातुमार्सामध्ये वैराग्याची भावना उत्पन्न झाली. तेव्हापासून ती सरिताश्री म. सा. यांच्या संपर्कात होती. जैन धर्मियांची शिकवण व जैन संतांच्या विचाराचा प्रभाव बालवयापासून पडत गेल्याने प्रिया हिची अंतिमत: जैन दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. ३१ डिसेंबर रोजी जैन धर्मियांच्या हजारो जनमुदायाच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथे प्रिया हिचा दीक्षा विधी होत आहे.
जैन संत व साध्वींच्या उपस्थित भव्य वरघोडा मिरवणूक काढण्यात आली. वरघोडा मिरवणुकीत घोडे, सुभेदार पथक, ढोल ताशाचे पथक नेत्रदीपक ठरत होते. मिरवणुकीत आकर्षक रथावर स्वार झालेल्या प्रिया व तिच्या आई-वडिलांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
सकाळी ८ वाजता गिरिजा कॉलनी येथील राहत्या घरून मिरवणुकीला सुरुवात झाली तर पाचोरा रोडवरील तुलसी नगर येथे सांगता होऊन यावेळी बांधवांतर्फे प्रिया यांच्या आई-वडिलांचा सन्मान करण्यात आला.
माजी खासदार ईश्वरलाल जैन, संघपती दलीचंद जैन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितानी महाप्रसादाचा लाभ घेतला. प्रिया आज बिदाई होणार असून गृहत्याग करणार आहे.
नाहाटा परिवाराचे नाव केले रोशन
प्रिया नाहाटा ही शिक्षित आहे. लोकांचे घर सजविता सजविता प्रिया ही आपल्या सांसारिक जीवनात मोठे पाऊल उचलत संसाराचा त्याग करण्याचा मार्ग अवलंबविला. एवढेच नव्हे तर आपल्या परिवाराचे नावदेखील रोशन केले. अवघ्या वयाच्या २७ व्या वर्षी घर, संसार या सगळ्या गोष्टींचा त्याग करीत आहे हे विशेष. प्रियाला तुषार आणि लोकेश हे दोन भाऊ आहेत.