छत्रपती संभाजीराजे यांच्या आवाहनाशी आम्ही सहमत...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:14 AM2021-06-02T04:14:45+5:302021-06-02T04:14:45+5:30
रावेर (जि. जळगाव) : मराठा आरक्षणासंदर्भात खासदार छत्रपती संभाजीराजे महाराज यांनी सर्व पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले असल्याने या ...
रावेर (जि. जळगाव) : मराठा आरक्षणासंदर्भात खासदार छत्रपती संभाजीराजे महाराज यांनी सर्व पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले असल्याने या प्रश्नी भाजप सरकारसोबत यायला तयार आहे. आवश्यक ती मदतही करायला तयार आहे. मात्र, त्यात जर कोणी राजकारण करीत असेल तर त्याला भाजप राजकारण करूनच उत्तर देईल, अशी स्पष्टोक्ती राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे दौऱ्यावर आले असता ‘लोकमत’शी बोलताना दिली.
खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पक्षविरोधी कुठेही व कोणतीही भूमिका मांडली नसून पक्षांतरासोबतच बरीच वक्तव्ये त्यांच्या तोंडी घातली जात आहेत. त्यांच्या पक्षांतराची अशी अद्याप कुठेही चर्चा नसल्याची पुष्टी त्यांनी जोडली.
संजय राऊतांची अवस्था ना घरका ना घाटका..
शरद पवार यांनी फडणवीस यांना १०० वर्षे महाआघाडीचे सरकार पडणार नाही म्हणून उत्कृष्ट विरोधी पक्षनेते पदासाठी तुम्ही दौरे करा, असा सल्ला दिल्याचे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केल्याबाबत पत्रकारांनी लक्ष वेधले असता, फडणवीस म्हणाले, खासदार संजय राऊत यांची अवस्था फार वाईट आहे. तुम्ही तसा चुकीचा अर्थ लावू नका. ते इकडचे आहेत की तिकडचे आहेत.. हेच समजायला मार्ग नसून सामनाच्या संपादक पदाची जबाबदारीही आमच्या वहिनी पाहत आहेत. त्यामुळे त्यांची अवस्था ना घरका ना घाटका.. अशी झाली असल्याने लक्ष्य वेधून घेण्यासाठी त्यांना अशी विधाने करावी लागत असल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.