आम्हीपण डॉ. डुलिट्ल
By admin | Published: June 20, 2017 01:16 PM2017-06-20T13:16:37+5:302017-06-20T13:16:37+5:30
डॉक्टर डुलिट्ल हे एका इंग्रजी कादंबरीमधलं पात्र आहे. त्यावरून चित्रपटही येऊन गेलेत. त्यात एडी मर्फी या कलाकाराने डॉ.डुलिट्लची भूमिका झकास केलीय.
Next
डॉक्टर डुलिट्ल हे एका इंग्रजी कादंबरीमधलं पात्र आहे. त्यावरून चित्रपटही येऊन गेलेत. त्यात एडी मर्फी या कलाकाराने डॉ.डुलिट्लची भूमिका झकास केलीय. हा डॉक्टर भलताच वैशिष्टय़पूर्ण आहे. त्याला प्राण्यांची भाषा समजते. तो कोणत्याही प्राण्याशी बोलू शकतो. तशी तर हॅरी पॉटरलाही विशेष शक्ती आहे. तो ‘पार्सलटंग’ आहे. म्हणजे त्याला सर्पभाषा बोलता येते. पण डॉ. डुलिट्ल अधिक जाणकार म्हणावा लागेल, कारण त्याला सगळ्याच प्राण्यांची भाषा येते.
एके काळी मला फार वाईट वाटायचं की, असं एखादं पात्र मराठीत का नाही? अशा दु:खी मन:स्थितीत असतानाच एके दिवशी मला अचानक दैवी साक्षात्कार झाला, की पात्रच कशाला? प्राण्यांची भाषा जाणणारे, त्यांच्याशी बोलणारे काही अनन्य शक्तिधारी महाभाग प्रत्यक्षातही आपल्या अवती-भवती वावरतात! पण ते जात्याच विनम्र असल्यामुळे त्यांचं मोठेपण लक्षात येत नाही.
असे एतद्देशीय डॉ.डुलिट्ल विशेषेकरून कुत्र्यांशी किंवा मांजरांशी बोलतात. हे संभाषण भलतेच हृदयस्पर्शी, परंतु ज्ञानवर्धक असते. शिवाय डॉ.डुलिट्ल या ‘मिसेस डॉ.डुलिट्ल’ असल्या तर मग संभाषणाला एक वात्सल्याची किनारही असते. ‘मम्मी दमलीय रे आता.. मम्मीला आराम करू दे बरं. माझा शहाणा सोन्या ना तू..?’ हे वाक्य कानी पडल्यावर ‘सोन्या’ शेपूट हलवित खोलीच्या बाहेर पडला की ऐकणा:याची काय अवस्था होत असेल!
परवा माझा एक जुना मित्र उत्तेजित स्वरात म्हणाला, ‘अरे.आमच्याकडे नुकताच एक छोटा पाहुणा आलाय घरी. आमच्या कुटुंबातला नवा सदस्य! चल घरी..दाखवतो.’ मी अंमळ बुचकळ्यात पडलो. याची धाकटी मुलगी नुकतीच नववीत गेली म्हणत होता. मग?.. बरं वहिनींचा कडक स्वभाव लक्षात घेता, आता या वयात गोड बातमी अजिबातच अपेक्षित नव्हती.
पण, असं एकदम बोलून कसं दाखवणार? मी पडलो भिडस्त. पण खरोखरंच त्याच्या घरी गेलो तर व्हरांडय़ातच वहिनींचं बोबडय़ा आवाजातलं बोलणं ऐकू आलं. ‘कच्चं गं माज्यं पिल्लू ते.. ओले ओले ùù..’ मी धीर आणि अभिनंदनाची वाक्यं गोळा करून आत गेलो, तर कोप:यात एका नाùùजूक टोपलीत ‘गोड बातमी’ क्यांव क्यांव करीत होती.
अशाच आणखी एक डुलिट्ल वहिनी आहेत. त्यांच्या घरी बोलता बोलता पावसाळी सहलीचा विषय निघाला, तशी त्यांनी ‘भलतंच काय!’ असा चेहेरा करून सांगितलं- ‘मी कुठ्ठेही येणार नाही. एक तर बबडीचे दिवस अगदी भरलेत. हो किनई गं बबडे?’ यावर बबडीने ‘म्यांव’ असे म्हणून ‘बातमी खरी आहे’, असं प्रमाणित केलं. ‘आता तर मी झोपतानाही हिला अंथरूणावर पायाशीच घेऊन झोपते.. मम्मी जवळ ’ - इति वहिनी.
मी (मनात) म्हटलं, ‘आणि पप्पा काय स्वयंपाकघरात कपाटापाशी मुटकुळं करून झोपतात की काय!’
शिंचे, हे लाडावलेले प्राणी कुणाच्याही अंगाशी जातात. हुंगतात काय, चाटतात काय! आपल्याला उगीच एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यालयात आल्यासारखं वाटायला लागतं. मी तर असं ऐकलंय की ही ‘बाळं’ रुसतातसुद्धा! मग डुलिट्ल मम्मी-पप्पा त्यांची समजूत घालतात. (प्राणी भाषेत ‘अजुनी रुसून आहे.’च्या धर्तीवर एखादं गाणं असेल का?) कधी कधी या प्राण्यांच्या भाग्याचा हेवा वाटतो. त्यांना एकदम फॅमिली मेंबरचाच दर्जा मिळतो. पोरांशी कुणी काय बोलेल इतक्या लाडाने त्यांच्याशी बोलतात लोक! इथे आमच्या लहानपणी पोटच्या पोरांशीसुद्धा प्राणी विश्वात्मक भाषेत बोलायची पद्धत होती- ‘कुठे कडमडून आलास गधडय़ा?’ किंवा ‘लोळत पडलीय बघा घोडी.’ ही अशी. रडायला गळा काढला, तर ‘हंबरू नका म्हशीसारखे..’
आमच्या लहानपणी जर एखाद्या माऊलीला, मांडीवर कुत्र्या-मांजराला बसवून कुच्ची कुच्ची करून लाडात बोलायला सांगितलं असतं, तर तिचा बहुदा हार्टफेल झाला असता.
डुलिट्ल बनना हर एक के बस की बात नही होती..जानी ùùù.
- अॅड.सुशील अत्रे