आम्ही चुका काढायला नाही तर मदतीला आलोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 12:26 PM2020-07-27T12:26:19+5:302020-07-27T12:26:37+5:30
केंद्रीय समितीचा दिलासा : प्रतिबंधित क्षेत्रात पाहणी, ‘कोविड’ मध्ये आढावा बैठक
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर तीन सदस्यीय केंद्रीय समितीने शहरातील कौतिक नगर, शिवाजीनगरात पाहणी केली़ कोविड रुग्णालयात बैठक घेऊन आम्ही चुका काढायला नाही तर तुमच्या मदतीसाठी आलो असल्याचे समितीचे प्रमुख कुणाल कुमार यांनी सांगत प्रशासनाचा भार हलका केला होता़
या तीन सदस्यीय समितीत केंद्रीय गृहनिर्माण विभागाचे सहसचिव कुणालकुमार, नागपूर एम्सचे सहयोगी प्राध्यापक डॉ़ अरविंद कुशवाह, सहाय्यक प्राध्यापक डॉ़ सितीकांता बॅनर्जी यांचा समावेश होता.
केंद्रीय समिती औरंगाबादहून रविवारी सकाळी शहरात दाखल झाली. शहरातील कौतिक नगर, शिवाजीनगरात पाहणी केली़ कोविड रुग्णालयात बैठक घेऊन चर्चा केली़ आम्ही चुका काढायला आलो नसून तुमच्या मदतीसाठी आलो असल्याचे सहसचिव कृणाल कुमार यांनी सांगून प्रशासनाचा भार हलका केला होता़
दोन सदस्यीय समितीच्या पाहणीनंतर आता त्रिसदस्यीय समितीने महिनाभरातनंतर शहरातील दोन प्रतिबंधित क्षेत्रात पाहणी केली़ नियोजीत दौऱ्यापेक्षा पाऊण तास उशिरा समिती दाखल झाली़
समितीने प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन नागरिकांशी संवाद साधला. सुरूवातीला अयोध्यानगर, कौतिक नगरमध्ये समिती ११.१५ वाजता दाखल झाली. आल्या आल्याच किती सर्व्हे झाला, किती रुग्ण आहे, याची माहिती कुणालकुमार यांनी माहिती विचारली.
या परिसरात १६ जुलै, ३ व २३ जुलैला ४ असे ७ रुग्ण दोन कुटुंबात आढळून आले असून त्यांच्या संपकार्तील ५६ लोकांची चाचणी केल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी सोनल कुलकर्णी यांनी दिली. ३४ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील १२ लोकांना अन्य व्याधी असल्याचे त्यांनी सांगितले, यावर तुम्ही सर्व्हेक्षण अधिक चांगल्या पद्धतीने करा, १४ दिवसानंतरही या लोकांवर लक्ष असू द्या अशा सूचना समितीने केल्या.
नागरिकांशी संवाद साधून अत्यावश्यक सेवा उपलब्ध होत आहेत का? अशी विचारणा कुणालकुमार यांनी केली. यावर एरिया बाहेरच गाडी येते तेथूनच आम्ही घेतो असे नागरिकांनी सांगितले.
आयसीयू उघडले
समिती येणार असल्याने नवीन आयसीयू अखेर आज उघडण्यात आला होता. या ठिकाणी चादरी लावण्याचे कामे केली जात होते.
मनुष्यबळाचा मुद्दा केंद्राकडे मांडणार
समितीने कोविड रुग्णालयात १५ मिनिटे चर्चा करून समितीने पाहणी केली. यात ओपीडी सहा काही वॉर्ड बघितले. १५ मिनिटांच्या पाहणीनंतर समिती परतली. या चर्चेदरम्यान, विविध मुद्दयांवर चर्चा करून समितीने काही सूचनाही दिल्या़ शिवाय ज्या काही अडचणी असतील त्या आम्हाला सांगा आम्ही वरिष्ठ पातळीवर त्या मांडू, असे समितीने सांगितले त्यानुसार अधिष्ठाता डॉ़ जयप्रकाश रामानंद यांनी मनुष्यबळ कमतरतेचा मुद्दा समितीला सांगितला़
कुणालकुमार यांनी रुग्णालयात मास्क बदलविले
कुणालकुमार यांनी सुरुवातीला कापडी मास्क परिधान केलेले होते. मात्र हे पाहणी दरम्यान लक्षात आल्यानंतर काही वेळ बाहेर थांबवून रुग्णालयातून न एन ९५ मास्क तातडीने मागविले. ओपीडीजवळ पाहणी करताना त्यांनी हे मास्क बद्दलविले व त्यानंतर कक्षात पाहणी केली.
अहवाल पोहोचविण्याच्या प्रक्रियेवर काम
नमुने घेण्यापासून ते अहवाल रुग्णापर्यंत पोहोचविण्यासाठी लागणारा अवधी खूप असून या सर्व घटकांची बैठक घेऊन ही यंत्रणा अधिक सुरळीत केल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी दिली. त्यावर बेड असिस्टंट या संकल्पनेवर समितीने समाधान व्यक्त केले.