आम्ही तुम्हाला ‘महात्मा’ दिला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:58 PM2018-03-22T12:58:01+5:302018-03-22T12:58:12+5:30
आफ्रिकी संस्कृतीशी तादात्म्य पावलेले भारतीय
शांतताप्रेमी लोकांना सोबत घेऊन जिद्दीने, कष्टाने देश नव्याने उभा करणाऱ्या नेल्सन मंडेला यांना महात्मा गांधी आणि भारत या दोघांविषयी नितांत आदर होता. गांधीजींविषयीचे त्यांचे विधान तर प्रसिद्ध आहे.
तुम्ही (भारत देशाने) आम्हाला ‘मोहन’ दिला, आम्ही (दक्षिण आफ्रिकेने) तुम्हाला ‘महात्मा’ दिला. आफ्रिकेत गांधीजी घडले, हे त्यांना या विधानात अभिप्रेत होते.
प्रिटोरियाकडे जाणाºया गांधीजींना वर्णविद्वेषी लोकांनी सामानासहित बाहेर ढकलले आणि गांधीजींच्या मनात क्रांतीची ठिणगी पडली. आफ्रिकेत आणि पुढे भारतात त्यांनी स्वातंत्र्य लढा उभारला. तेथील गांधी आश्रम आणि जोहान्सबर्गमधील गांधी स्क्वेअर ही स्मारके त्याची साक्ष आहेत.
भारतीय १८६०च्या सुमारास डर्बन या पूर्व किनाºयावरील बंदरावर प्रथम उतरले. उसाच्या मळ्यामध्ये काम करण्यासाठी भारतातून काही शेतमजूर, तर व्यापारासाठी काही व्यापारी तेथे सुरुवातीला गेले. डर्बन येथे भारतीय वसाहत आहे. भारतातील समुद्रकिनाºयाप्रमाणे दमट आणि उबदार हवामान या पूर्व किनारपट्टीवर असल्याने बहुदा भारतीयांना ती मानवली असावी.
आता भारतीय बºयापैकी सर्वत्र स्थिरावले आहेत. दिवाळीसारखे सणदेखील सामूहिकपणे साजरे केले जातात.
तेथील पर्यटन विभागाने पत्रकारांच्या प्रतिनिधी मंडळाला आवर्जून भारतीय व्यक्तींच्या रेस्टॉरंटशी भेटी घडवून आणल्या. जॉर्ज शहरातील आंध्र प्रदेशातील मीनाक्षी आणि त्यांच्या पतीचे ‘मीनाक्षीज्’ हे रेस्टॉरंट, त्याच शहरातील धीरेन पांचाळ या मुंबईकराचे ‘रसोई’, केपटाऊननजीकच्या फिशहोक येथील ‘भंडारीज्’, पाकिस्तानी व्यक्तीचे ‘बिस्मिल्लाह’ या रेस्टारंटला भेटी दिल्यानंतर भारतीय खाद्यपदार्थांची लज्जत चाखता आली आणि तेथील भारतीय मंडळींशी संवाद साधता आला. शाकाहारी, मांसाहारी पदार्थ, दक्षिण व उत्तर भारतीय पदार्थ ‘भारतीय चव’ टिकवून आहेत, याचा आनंद झाला. पाकिस्तानी नागरिकदेखील तेथे मोठ्या संख्येने राहतात. हिंदी भाषेमुळे सख्य जुळते. फिशहोक येथे मोबाइल शॉपचा संचालक असलेल्या मो.वकास, आऊटश्रून येथे चायना मॉल चालविणारा तारीक चांगले मित्र बनले.
दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन देशांमध्ये बरीच साम्यस्थळे आहेत. निसर्ग आणि निसर्ग रचनेत साधर्म्य आहे. घनदाट जंगल, गवताळ जंगल असे जंगलातील वैविध्य आपल्यासारखेच तिथेही आहे. तिथे ९ राज्ये, ११ भाषा, वैविध्यपूर्ण भौगोलिकता आणि असंख्य संस्कृती आहेत. भारतातील भौगोलिक आणि सांस्कृतिक वैविध्य असेच आहे. वर्णविद्वेष/धार्मिक द्वेष, गरिबी, रोगराई, शिक्षणाचा अभाव हे प्रगतीतील अडथळे दोन्ही देशात सारखेच आहेत. जोहान्सबर्ग, केपटाऊनसारखी शहरे अत्याधुनिक आणि पाश्चात्य देशांच्या जीवनशैलीचे अनुकरण करणारी आहेत, तशीच आपल्याकडेही दिल्ली, मुंबई, बंगलोर ही महानगरे आहेत. खेडी आणि महानगरे यांच्या जीवनशैलीतील फरक जमीन-अस्मानासारखा आहे, तो दोन्हीकडे तसाच आहे.
दक्षिण आफ्रिका हा तर मानववंशाचा पाळणा मानला जातो. तेथील रुढीपरंपरा, खाद्यसंस्कृती, नृत्य, गायनादी कला आणि ज्ञानाचा वारसा त्यांना लाभलाय. आपण भारतीयदेखील या क्षेत्रात आघाडीवर आहोत.
ही साम्यस्थळे पाहून आफ्रिकेत फारसे परके वाटत नाही, ही जमेची बाजू आहे. (समाप्त)
- मिलिंद कुलकर्णी