गावाकडे हाताला काम नसल्याने परत यावेच लागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 01:26 PM2020-08-06T13:26:04+5:302020-08-06T13:26:19+5:30
परप्रांतीय तरुणांची व्यथा : काही जण शेती कामात गुंतले
जळगाव : कोरोनाच्या संकटात गावी गेलो, तेथे तीन-साडेतीन महिने कसेबसे काढले. मात्र हाताला काम नाही, पोटाची खळगी कशी भरणार, रोजगार मिळेल तेथे जाऊन काम केल्या शिवाय पर्याय नाही, अशी खंत लॉकडाऊनच्या संकटाविषयी ‘लोकमत’शी संवाद साधताना परप्रांतीय तरुणांनी व्यक्त केली. काही परप्रांतीय तरुण परलते असले तरी काही जण गावीच शेती कामात गुंतले आहे तर बंगाली सुवर्ण कारागिरांनाही सुवर्णनगरीत परतण्याचे वेध लागले आहे. औद्योगिक वसाहत परिसरातील उद्योगांनाही मजुरांची प्रतीक्षा आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून लॉकडाऊनचे संकट ओढावले व सर्व व्यवहार ठप्प झाले. याची झळ स्थानिक व्यावसायिक, कामगार, नोकरदार यांना बसण्यासह मोठ्या प्रमाणात जळगावात असलेल्या परप्रांतीयांनाही बसला. त्यामुळे हजारो परप्रांतीय तरुण गावी परतले. यात गावी परतलेल्या बंगाली सुवर्ण कारागिरांचीच संख्या ११ ते १२ हजार आहे.
व्यवसाय कमी असल्याने संख्या कमी
सध्या व्यवहार सुरू झाले असले तरी पाहिजे त्या प्रमाणात व्यवसाय नसल्याने ५० टक्केच कारागिर, मजूर कामावर आहे. व्यवसायाअभावी इतर जणांना व्यावसायिकही बोलाण्यास धजावत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
काम नसल्याने परतले जळगावात
परप्रांतीय तरुणांना जाताना गावाची ओढ जेवढी होती, तेथे गेल्यानंतर त्यांना पुन्हा तेवढीच कामाचीही ओढ लागल्याचे या तरुणांचे म्हणणे आहे. या संदर्भात खाद्य पदार्थांच्या दुकानांवर कारागिर असलेल्या मूळ राजस्थानचे असलेल्या तरुणांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात दुकान बंद असल्याने येथे असताना हाताला काम नव्हते. मालक मदत करायचे. मात्र त ेदेखील किती दिवस मदत करतील, या विचाराने आम्ही गावी जायचा निर्णय घेतला. तेथे तीन-साडेतीन महिने थांबलो, मात्र तेथेही हाताला काम नव्हते. घरचे मंडळी किती दिवस संभाळणार, असाही प्रश्न तेथे उभा राहिला. त्यामुळे पुन्हा जळगावात कामाच्या ठिकाणी येण्याचे वेध लागले. कामासाठी व पोटासाठी पुन्हा येथे परतण्याशिवायही पर्याय नव्हता त्यामुळे येथे आलो असून हाताला काम मिळाल्याचे समाधान आहे, असेही अनुप माली व शिवराज माली यांनी सांगितले.
बंगाली कारागिरही येण्यासाठी उत्सुक
सुवर्णनगरीत कलाकुसरीचे सुवर्ण अलंकार घडविण्यात हातखंडा असलेले बंगाली सुवर्ण कारागिरांपैकीही ११ ते १२ हजार कारागिर गावी गेले आहे. त्यातील १०० ते १५० जण परतले आहे. इतरांनाही कामासाठी जळगावात यायचे आहे, मात्र प्रवासाची सुविधा नसल्याने त्यांच्यासमोर येण्याबाबत चिंता असल्याचे बंगाली सुवर्णकार असोसिएशनचे सचिव महेंद ्रमायटी यांनी सांगितले.
गावी गेलेल्या मजुरांपैकी २० ते २५ टक्के मजूर परतले आहेत. आता उर्वरित मजुरांची परतण्याची प्रतीक्षा आहे.
- सचिन चोरडिया,
सचिव, जिंदा
गावी तीन ते साडेतीन महिने राहिलो. मात्र घरात बसून उदरनिर्वाह कसा चालणार, असा प्रश्न होता. पोटासाठी काम मिळेल, तेथे जावेच लागणार.
- शिवराज माली,
राजस्थानी कारागिर.
गावाकडे गेलो, मात्र तेथे काही काम नव्हते. कामाच्या शोधात कोठे भटकणार, या चिंतेत होतो. कामासाठी येण्याशिवाय पर्याय नव्हता.
- अनुप माली, राजस्थानी कारागिर
व्यवसाय सुरू झाल्याने मजूर परतत आहे. यात निम्मे मजूर आले असून उर्वरित मजूर गावी शेतीकामात गुंतले आहेत. व्यवसायही मंदावला असल्याने जास्त मजूर कसे येणार, अशीही चिंता आहे.
- किरण तापडिया, फरसाण, मिठाई विक्रेते.