महाराष्ट्राच्या विकासासाठी जी लढाई आम्ही लढलो, ती आम्ही जिंकलो : नवनीत राणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 09:16 PM2022-09-05T21:16:40+5:302022-09-05T21:18:53+5:30
मुंबई महापालिकेत गेल्या दोन पिढ्यांपासून जे राजकारण सुरू होतं त्याला आता फुल स्टॉप लागणार, राणा यांनी व्यक्त केला विश्वास.
प्रशांत भदाणे
महाराष्ट्राच्या विकासासाठी जी लढाई आम्ही लढलो ती आम्ही जिंकलो आहोत. येणाऱ्या काळात लव जिहादच्या विरोधात आम्ही मोठी मोहीम उभारू. लव्ह जिहादचा खात्मा करण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे, अमरावती जिल्ह्यापासून आम्ही त्याची सुरुवात केली आहे आणि जळगावत त्याचं जाहीर आव्हान करत असल्याचे वक्तव्य खासदार नवनीत राणा यांनी केले.
“हनुमान चालीसाचे पठण केलं त्यामुळे आम्हाला ठाकरे सरकारने तुरूंगात टाकलं होतं, आम्ही निर्दोष होतो तरी आम्हाला १४ दिवस तुरुंगामध्ये राहावं लागलं. ज्यांचा वध करायचा होता त्याचा वध आम्ही केला आणि त्यांना घरी बसवलं,” अशा शब्दात नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टीका केली. अमरावती जिल्ह्यातील ज्या मुली लव्ह जिहादच्या कचाट्यात सापडल्या आहेत, त्यांच्याशी संपर्क करून त्यांना आणि कुटुंबीयांना मदत करण्याचं काम सुरू आहे. राज्यात ज्या ज्या ठिकाणी लव्ह जिहादच्या कचाट्यात कुणी सापडले असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करावा त्यांना मदत करण्याचे काम करणार असल्याचंही त्या म्हणाल्या.
मुख्यमंत्री पदावर असताना उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले ते फक्त फेसबुकच्या माध्यमातून जनतेपर्यंत जात होते, ही महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी बाब होती अशी टीकाही नवनीत राणा यांनी केली. 0आमच्या कणाकणात हनुमानजी आहेत, त्यामुळे हनुमान चालीसाचे पठण करून राज्यावरचं संकट दूर करणं हा आमचा हेतू होता. मी एक महिला आहे त्याशिवाय २५ लाख लोकांमधून निवडून गेलेली खासदार देखील आहे. त्यामुळे संसदेत बोलत असताना मी फक्त माझ्या मतदारसंघापुरतं नाहीतर देशातल्या महिलेचा आवाज म्हणून बोलत असते. उद्धव ठाकरे यांनी मला जेलमध्ये टाकण्याचं काम केलं, त्याची शिक्षा त्यांना भोगावे लागेल. अजूनही तर सुरुवात आहे, पिक्चर अजून बाकी आहे अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंना इशाराही दिला.
आता फुलस्टॉप लागणार
आताचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे जीवाचे रान करून काम करत आहेत अशी स्तुती सुमनेही नवनीत राणा यांनी उधळली. गेल्या अडीच वर्षात जेवढे काम झालं नाही, दीड महिन्यातच या सरकारने जीआर काढले. सुरुवात चांगली झाली आहे असेही त्या म्हणाल्या. मुंबई महापालिकेत गेल्या दोन पिढ्यांपासून जे राजकारण सुरू होतं त्याला आता फुल स्टॉप लागणार आहे, रामभक्त आणि हनुमान भक्त हे करून दाखवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.