अक्षयतृतीयेला एरंडोलवासीयांची घागर लमांजन तलावाच्या पाण्याने भरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 07:29 PM2019-04-25T19:29:43+5:302019-04-25T19:31:11+5:30
१८ पैकी १० कि.मी.पाईप लाईन टाकण्याचे काम पूर्ण
एरंडोल : एरंडोल येथे लमांजन पाणी पुरवठा योजनेत १८ पैकी १० कि.मी.पाईप लाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.
सध्या एरंडोल येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जवळपास १० ते १२ दिवसांनी शहरात नगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा केला जात आहे. टंचाई काळात लमांजन पाणीपुरवठा योजना शहरासाठी वरदान ठरणार आहे .या योजनेअंतर्गत १८ किलोमीटर लांबीपैकी १० किलोमीटरपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी दिली आहे.
या योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असून या महिनाअखेर योजनेचे काम पूर्ण होईल, असे नियोजन करण्यात आलेले आहे. म्हणून अक्षयतृतीयेला एरंडोलवासीयांची घागर लमांजन तलावाच्या पाण्याने भरणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या एरंडोल येथे जवळपास तीस हात पंप सुरू आहेत. २२ हातपंप प्रस्थावित आहेत. ४० विहिरींचा गाळ काढण्यात यावा, अशी सूचना पुढे येत आहे . तसेच शहरातील २० ते २२ सार्वजनिक सुलभ शौचालयांसाठी नगरपालिकेने विहिरीद्वारे पाणीपुरवठा केला आहे. त्यामुळे पाण्याची बचत होत आहे. अंजनी धरणातील संपुष्टात आलेल्या जलसाठ्यातील पाणी तसेच स्मशानभूमीतील विहिरीचे पाणी घेऊन शहरात पाणीपुरवठा करून नगरपालिका पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न करीत आहे. लमांजन योजनेसाठी ८ लाख ७२ हजार रुपये खर्च होईल, अशी अपेक्षा आहे. या योजनेचे काम कधी पूर्ण होणार व या योजनेद्वारे पाणीपुरवठा केव्हा होणार याकडे लक्ष लागून आहे.