घरी लग्नाची धावपळ त्यात सुवर्ण पेढीची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 12:12 PM2020-02-26T12:12:42+5:302020-02-26T12:13:00+5:30
जीएसटी विभागाचे पथक दोन दिवस ठाण मांडून
जळगाव : सोन्याची नोंदणी, कागदपत्रे (रेकॉर्ड) नसल्याच्या संशयावरून केंद्रीय वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) पथकाने मंगळवारी जळगावातील किशोरकुमार भागचंद सुराणा या सुवर्ण पेढीची तपासणी केली. सोमवारपासून दाखल झालेले हे पथक जळगावात दोन दिवस ठाण मांडून होते. विशेष म्हणजे ज्या सुवर्ण पेढीची तपासणी झाली त्या पेढीच्या मालकांच्याच घरी लग्न सोहळा होता.
सराफ बाजार परिसरात असलेल्या किशोरकुमार भागचंद सुराणा या सुवर्ण पेढीच्या मालकीचे तीन किलो सोने इंदूर येथे तर दीड किलो सोने जळगावात आढळून आले. मात्र त्याची नोंद नसल्याचा संशय जीएसटीच्या पथकाला आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार चार ते पाच अधिकाऱ्यांनी जळगावात या दुकानाची तपासणी केली.
सोमवारी दाखल झालेले हे पथक मंगळवारीदेखील शहरात होते. सकाळी या सुवर्ण पेढीत गेल्यानंतर बराच वेळ दुकान आतून लावून पथकाने तपासणी केली. या बाबत अधिकाऱ्यांनी मात्र बोलण्यास नकार दिला. या तपासणीमुळे सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली.
तपासणीसाठी जीएसटीचे अधिकारी आले होते. त्यांनी कागदपत्रांची तपासणी केली. त्यात त्यांना सर्व व्यवहार व्यवस्थित आढळून आले. त्यात काहीही आक्षेपार्ह नव्हते.
-किशोर सुराणा, सुवर्ण व्यावसायिक.