अमळनेरात महिलांसाठी सुरू होणार आठवडे बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 04:23 PM2019-12-11T16:23:00+5:302019-12-11T16:25:30+5:30
महिला बचत गट आणि महिला गृहउद्योग यांनी उत्पादित केलेल्या मालाला अथवा ते विक्री करीत असलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी महिला आठवडे बाजार सुरू करण्याची संकल्पना मांडली आहे.
अमळनेर, जि.जळगाव : महिला बचत गट आणि महिला गृहउद्योग यांनी उत्पादित केलेल्या मालाला अथवा ते विक्री करीत असलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी अमळनेरात महिला आठवडे बाजार सुरू करण्याची संकल्पना माजी आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवार व झेप फाऊंडेशन यांनी मांडली आहे. २५ डिसेंबरपासून याचा अमळनेरात शुभारंभ होणार असल्याची माहिती माजी आमदार शिरीष चौधरी व झेप फाऊंडेशनच्या रेखा चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला अनिता शिरीष चौधरी यादेखील उपस्थित होत्या. विशेष म्हणजे भारतात प्रथमच अमळनेरात महिला आठवडे बाजाराचा प्रयोग होत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या उपक्रमाविषयी अधिक बोलताना ते म्हणाले की, अमळनेर तालुक्यात अनेक बचत गट व महिला गृहउद्योग असून, काही गट स्वत:चे उत्पादन करतात, तर काही मोठ्या मार्केटमधून वस्तू आणून त्यांची विक्री करीत असतात. परंतु प्रचंड मेहनत घेत असतानाही त्यांना मार्केट व खरेदीदार उपलब्ध होत नसल्याने त्यांना चालना मिळत नाही. यासाठी आम्ही महिला आठवडे बाजार ही संकल्पना तयार केली आहे. त्याचे रजिस्ट्रेशनदेखील केले आहे. हा आठवडे बाजार दर रविवारी शिरीष चौधरी यांच्या स्टेशनरोडवरील इंदुमती निवासस्थानी भरविला जाणार आहे. याठिकाणी महिला बचत गटांना मोफत स्टॉल उपलब्ध करुन दिले जातील. तसेच एखादी महिला स्वत:चा उद्योग घरच्या घरी करीत असेल तिलाही याठिकाणी स्टॉल दिला जाणार आहे. प्रतिसाद जास्त लाभल्यास रोटेशन पद्धतीने प्रत्येक बचतगटास स्टॉल उपलब्ध करुन दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, रेखा चौधरी यांनी सांगितले की, बऱ्याच ठिकाणी बचत गटांच्या मालाला मार्केट मिळण्यासाठी प्रदर्शनभरविले जातात. परंतु तेवढ्याने त्यांचे माकेर्टींग होत नाही. त्यांना नियमित मार्केट उपलब्ध व्हावे यासाठी महिला आठवडे बाजाराची संकल्पना आम्ही राबवित आहोत. यात सहभागी होणाऱ्यांना मुंबई, पुणे, नाशिकसारख्या मोठ्या शहरांमध्ये होणाºया भव्य प्रदर्शनामध्येदेखील आम्ही संधी उपलब्ध करुन देणार आहोत. यावेळी गटनेते प्रवीण पाठक, नगरसेक्क नरेंद्र चौधरी, सुनील भामरे, योगराज संदानशिव, अनिल महाजन, धनू महाजन, गुलाब आगळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.