परीक्षा रद्द निर्णयाचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:17 AM2021-04-22T04:17:19+5:302021-04-22T04:17:19+5:30
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने ...
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने स्वागत करण्यात आले आहे. दरम्यान, आता पुढील प्रवेश प्रक्रिया कशी राबविणार, याबाबत शासनाकडून कुठल्याही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. हा संभ्रम दूर करण्याची मागणी अभाविपकडून करण्यात आली आहे.
==============
एनएमएमएस परीक्षेची उत्तरसूची प्रसिध्द
जळगाव : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने ६ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती योजना परीक्षेची अंतरिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. २३ एप्रिलपर्यंत त्रुटी व आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार आहे.
=============
स्वाध्याय उपक्रमात २ लाख ७३ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
जळगाव : शाळा बंद असल्यामुळे शिक्षण विभागाकडून स्वाध्याय हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमात जळगाव जिल्ह्यातील सहा लाख विद्यार्थ्यांपैकी २ लाख ७३ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. मात्र, या उपक्रमात मागील आठवड्यात राज्यातील टॉप थ्री जिल्ह्यांमध्ये जळगाव जिल्ह्याला जागा मिळविता आली नाही. सोलापूर जिल्ह्याने बाजी मारली होती.
=============
कास्ट्राईब महासंघातर्फे अभिवादन
जळगाव : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अनिल सुरळकर, सुनील सोनवणे, आर.टी.सोनवणे, जितेंद्र जावळे, रवीकरिण बिऱ्हाडे, अरशद शहा, जितेंद्र बारी आदी उपस्थित होते.