कोरोनामुक्त बाळाचे जिलेबी वाटप करून केले स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:14 AM2021-04-26T04:14:18+5:302021-04-26T04:14:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : हृदयाला छिद्र, श्वास घेण्यास त्रास अशी गंभीर अवस्था असताना बाधित असलेल्या एका नवजात चिमुकलीवर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : हृदयाला छिद्र, श्वास घेण्यास त्रास अशी गंभीर अवस्था असताना बाधित असलेल्या एका नवजात चिमुकलीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात यशस्वी उपचार करून २७ दिवसांनी ही चिमुकली बरी होऊन मातेच्या कुशीत गेली. ती बरी झाल्यानंतर घरी अगदी रांगोळी काढून घरच्यांनी या चिमुकलीचे स्वागत केले.
तुकारामवाडी येथील रहिवासी अंशू योगेश चौधरी या कोविड पॉझिटिव्ह महिलेला प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसूती झाल्यानंतर नवजात बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने २७ मार्च रोजी या बाळाला नवजात शिशू काळजी कक्ष विभागात दाखल करण्यात आले होते. पहिला स्वॅब निगेटिव्ह आला. परंतु बाळाला श्वासाचा त्रास सुरूच होता. म्हणून हृदयाची तपासणी करून घेतली त्या तपासणीत हृदयाला छिद्र असल्याचे निदान झाले होते.
दुसरी चाचणी पॉझिटिव्ह
या चिमुकलीच्या पांढऱ्या पेशी सातत्याने खूप जास्त वाढत होत्या. त्यामुळे डॉक्टरांनी पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय घेतला. सातव्या दिवशी दुसरा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आला. यात बाळाला कोरोना असल्याचे निदान झाले. अशा स्थितीत परिस्थिती बिकट झाली होती. शिवाय बाळाचा श्वासाचा त्रास वाढल्याने त्याला ऑक्सिजन लावण्यात आले होते.
प्रोटोकॉल वेगळा
बालक व मोठे रुग्ण यांचा कोविड उपचारांचा प्रोटोकॉल अगदी वेगळा असून लहान बाळांना मोठ्यांची औषधे देता येत नाहीत, अशा स्थितीत त्यांना ॲन्टिबायोटिक शिवाय संसर्ग कमी करण्याची औषधे देण्यात येतात. या बाळालाही तीच औषधे सुरू होती. काही दिवसांनी त्याच्या तब्बेतीत सुधारणा झाली. नंतर चार दिवस या बाळाला ऑक्सिजन न लावता ठेवण्यात आले व डॉक्टरांची याचे निरीक्षण केले. चार दिवस त्याला कृत्रिम ऑक्सिजन पुरवठ्याची गजर न पडल्याने शिवाय बाळ दूधही व्यवस्थित पीत असल्याने डॉक्टरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. शिवाय या बाळाचा जन्म ३५ आठवड्यात झाला होता. रविवारी हे बाळ बरे झाल्यानंतर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी डिस्चार्ज कार्ड देऊन बाळाला मातेकडे सोपविले. बालरोग व चिकित्सा शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. वृषाली सरोदे, डॉ. अखिलेश खिलवाडे, डॉ. शैलजा चव्हाण आदी वैद्यकीय पथकाने यशस्वी उपचार करीत या चिमकुलीला कोरोनामुक्त करून घरी पाठविले.
कुटुंबीयांकडून जल्लोष
चिमुकलीच्या आई-वडिलांसोबत घरी आगमन होताच कुटुंबीयांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. अंगणात रांगोळी काढून, सजावट करून शिवाय परिसरात जिलेबी वाटून आनंदोत्सव साजरा केला.