बहुप्रतीक्षित विमानसेवेची स्वप्नपूर्ती, जळगाव-मुंबई विमानसेवेचे जल्लोषात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 11:35 PM2017-12-23T23:35:33+5:302017-12-23T23:42:37+5:30
पहिल्याच दिवशी अडीच तास विलंब
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 23- बहुप्रतीक्षित अशा विमानसेवेची शनिवारी स्वप्नपूर्ती झाली. जळगाव ते मुंबई हे प्रवासी विमान जळगाव विमानतळावर दुपारी 3.48 वाजता पोहचताच जळगावकरांनी जल्लोषात स्वागत केले. पहिल्याच दिवशी विमानाला अडीच तास विलंब झाला. त्यामुळे लोकप्रतिनिधी व नागरिक ताटकळले होते. कंटाळलेले काही लोकप्रतिनिधी शुभारंभापूर्वीच विमानतळावरुन रवाना झाले.
गेल्या अनेक वर्षापासून जळगावकरांचे विमानसेवेचे स्वप्न होते. अखेर शनिवार, 23 रोजी जळगावकरांची स्वप्नपूर्ती झाली. मुंबई ते जळगाव हे एअर डेक्कनच्या विमानाचे शनिवारी दुपारी 1.15 वाजता आगमन होणार होते, ते तब्बल अडीच तास म्हणजेच 3.48 वाजता जळगाव विमानतळावर पोहचले. मुंबई विमानतळावर स्लॉट न मिळाल्याने विमानास विलंब झाला. या विमानातूनच आलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते हिरवी ङोंडी दाखवून विमानसेवेचा शुभारंभ झाला.
यावेळी एअर डेक्कनचे संचालक कॅप्टन जी.आर. गोपीनाथ, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार ए.टी. पाटील, महापौर ललित कोल्हे, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्जवला पाटील, जैन उद्योग समुहाचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, विमानतळ विकास प्राधिकरणचे महाव्यवस्थापक विकास चंद्रा यांच्यासह एअर डेक्कनचे अधिकारी व शहरातील उद्योजक, व्यापारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
राज्यातील 15 लहान शहरांमध्ये विमानसेवा
सर्वसामान्यांना विमानाद्वारे प्रवास करता यावा, यासाठी केंद्र शासनाच्या उडान या योजनेद्वारे महाराष्ट्रातील जळगावसह 10 शहरांमध्ये पहिल्या टप्प्यात विमानसेवा सुरु होत आहे. शनिवार, 23 रोजी जळगावातून विमानसेवेचा प्रारंभ झाला. दुस-या टप्प्यात राज्यातील आणखी 5 शहरांमध्ये विमानसेवा सुरु करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
भवरलाल जैन व माङो विमानसेवेचे स्वप्न पूर्ण झाले..
जळगावात आज विमानसेवेचा शुभारंभ झाला. मुंबई येथे जाण्यासाठी जळगावातून दररोज एक विमान असेल. वर्षभरानंतर दोन विमाने सोडण्यात येतील. सर्वसामान्यांना विमानसेवा मिळावी ही जैन उद्योग समुहाचे संस्थापक भवरलाल जैन व माङो स्वप्न होते. ते आज पूर्ण झाल्याचा आनंद यावेळी एअर डेक्कनचे संचालक कॅ.गोपीनाथ यांनी व्यक्त केला.
जळगाव सारख्या लहान शहरांमध्ये विमानसेवा सुरु होण्यासाठी मुंबई विमानतळावर 25 टक्के रिजनल कनेक्टीव्हीटी मिळणे आवश्यक आहे. ती मिळाल्यास राज्यभरातील अनेक शहरांमध्ये विमानसेवा सुरु करता येईल, असेही कॅ.गोपीनाथ यावेळी म्हणाले.