‘मेडिकल हब’चे स्वागत, मात्र अगोदर पुरेसा सुविधा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 09:19 PM2018-12-16T21:19:45+5:302018-12-16T21:22:47+5:30
जळगावात वैद्यकीय संकूल उभारण्यास गती
विजयकुमार सैतवाल
जळगाव : जळगावात वैद्यकीय संकूल उभारण्यास गती आली असून या संकुलाचे स्वागत आहे, मात्र त्या पूर्वी आहे त्या आरोग्य केंद्रांमध्ये पुरेसा सुविधा द्या, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जळगावात कोट्यवधी रुपये खर्च करून वैद्यकीय संकूल उभारले जाणार आहे. त्याची सुरुवात जिल्हा रुग्णालयातून झाली आहे. वैद्यकीय संकूल उभारणे स्वागतार्ह असल्याचे जिल्हावासीयांचे म्हणणे आहे. मात्र जिल्हा रुग्णलायात अगोदरच असलेल्या समस्या मार्गी लावण्याचीही मागणी होत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आपत्कालीन विभागासाठी वारंवार सुरक्षा रक्षकांची मागणी करूनही ते मिळत नसल्याने येथील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. या सोबतच औषधनिर्मातादेखील मिळत नसल्याने येथे रुग्णांचे औषधीविना हाल होतात.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आपत्कालीन विभागात अपघात व इतर वेगवगेळ््या आजाराचे रुग्ण येतात. तसेच त्यांच्यासोबत १०० ते १५० नातेवाईक व इतर मंडळीसुद्धा असतात. त्यामुळे या ठिकाणी मोठा गोंधळ होतो. यातून बऱ्याच वेळा वाद होतात व कधी कधी तर वैद्यकीय अधिकाºयांना मारहाण सुध्दा केली जाते. असे असतानाही येथे सुरक्षा रक्षक उपलब्ध करून दिले जात नाही. रुग्णालयात २१ सुरक्षा रक्षक आहे. मात्र सर्वात महत्त्वाचा विभाग असलेल्या आपत्कालीन विभागातच सुरक्षा रक्षक नाही. ज्या ठिकाणी आवश्यकता नाही तेथे सुरक्षा रक्षक तैनात केले जातात, असा आरोप केला जात आहे. आपत्कालीन विभागात रात्र पाळीला औषधनिर्माता नसल्याने औषध देण्यास कोणीच नसते. त्यामुळे औषध कोणी द्यायचे असा प्रश्न निर्माण होतो. अनेक अडचणी येत असल्या तरीदेखील औषधनिर्माता नसल्याचे कारण सांगत चाल-ढकल केली जात असल्याचेही तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे.
ताजे उदाहरण म्हणजे गेल्या शुक्रवारी संध्याकाळीदेखील चाकू हल्ल्यातील रुग्णांना येथे आणल्यानंतर आपत्कालीन विभागात गर्दी झाली होती. त्यामुळे उपचारात अडचणी येत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेर जाण्यास सांगण्यात येत होते. मात्र कोणीही बाहेर निघत नव्हते. अखरे सुरक्षा रक्षकाला बोलावून नातेवाईक व इतरांना बाहेर काढण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाºयांनी दिल्या. मात्र सुरक्षा रक्षकच नसल्याचे कर्मचाºयांनी सांगितले.