‘सौराष्ट्र तमिळ संगमम’ एक्स्प्रेसचे जळगाव स्टेशनवर वाजत-गाजत स्वागत
By विलास.बारी | Published: April 18, 2023 07:24 PM2023-04-18T19:24:02+5:302023-04-18T19:24:20+5:30
या एक्स्प्रेससोबतच त्यांना या यात्रेबाबत आलेल्या अनुभवांचे अभिप्राय देखील रेल्वेकडून घेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ उपक्रमाअंतर्गत दोन वेगवेगळ्या राज्यांमधील संस्कृतीचे आदान-प्रदान व्हावे, या उद्देशाने ‘सौराष्ट्र तमिळ संगमम’ ही विशेष एक्स्प्रेस गुजरात ते तमिळनाडूदरम्यान सुरू करण्यात आली असून, मंगळवारी दुपारी या विशेष एक्स्प्रेसचे आगमन जळगाव रेल्वेस्टेशनवर झाले. यावेळी जळगाव रेल्वेस्टेशन प्रशासनाकडून ढोल-ताशांच्या गजरात या एक्स्प्रेसचे स्वागत करण्यात आले.
यावेळी स्टेशन प्रबंधक ए. एम. अग्रवाल, प्रमोद साळुंखे, मनीष शर्मा, ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह रेल्वेचे इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या एक्स्प्रेसमधून जाणाऱ्या प्रवाशांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले; तसेच या एक्स्प्रेससोबतच त्यांना या यात्रेबाबत आलेल्या अनुभवांचे अभिप्राय देखील रेल्वेकडून घेण्यात आले. रेल्वे प्रशासनाने ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ उपक्रमाअंतर्गत मदुराई ते द्वारकादरम्यान ही रेल्वे सुरू केली आहे. या रेल्वेला भुसावळ व जळगावला थांबा देण्यात आला आहे. सौराष्ट्रमधील सोमनाथ व तमिळनाडूतील रामेश्वर या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणाऱ्या भाविकांचा प्रवास चांगला होण्यासाठीही या विशेष एक्स्प्रेसचे नियोजन करण्यात आले आहे.