सकारात्मकतेचा संकल्प करत नववर्षाचे जल्लोषात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:11 AM2021-01-01T04:11:45+5:302021-01-01T04:11:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : २०२० च्या कटु आठवणींना गुड बाय करत, सुदृढ आरोग्य व सकारात्मक उर्जेचा संकल्प करत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : २०२० च्या कटु आठवणींना गुड बाय करत, सुदृढ आरोग्य व सकारात्मक उर्जेचा संकल्प करत तरुणाईने नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. कोरोनामुळे प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत रात्री १० च्या आतच सरत्या वर्षाला निरोप देत व सेलीब्रेशन करत नवीन वर्षाचे स्वागत जळगावकरांनी केले. संचारबंदी कायम असल्याने रात्री ११ नंतर रस्त्यावर शुकशुकाट पहायला मिळाला. शहरात संचारबंदी असल्याने शहरातील तरुणाईने जळगाव शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागात जात नववर्षाचे सेलीब्रेशन केले.
कोरोनामुळे २०२० हे वर्ष अनेकांना दुख: देणारे ठरले. मात्र, सुख, दु:ख हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग समजून नवीन सुरुवात करावी लागते. हाच सकारात्मक संकल्प करून गेल्या वर्षांच्या कटु आठवणींना तिलांजली देत, बोचऱ्या थंडीत, शेकोटीच्या सानिध्यात नववर्षाचे स्वागत जळगावकरांनी केले. आरोग्य हेच जीवन म्हणत, आरोग्य सुदृढ ठेवण्याचा संकल्प अनेकांनी या नववर्षाच्या स्वागताच्या पुर्वसंध्येला केला.
पोलीसांचा तगडा बंदोबस्त
नववर्षाचे सेलिब्रेशन म्हटले की गोंधळ, उन्माद हा असतोच. त्यामुळे पोलिसांनी गुरुवारी रात्री शहरात ठिकठिकाणी चोख बंदोबस्त लावला होता. प्रत्येक चौकात पोलीस तैनात होते. तसेच रात्री १० नंतर मोटारसायकलवरून जाणाऱ्यांची तपासणी देखील पोलिसांकडून केली जात होती.
घरातच राहून केले स्वागत
कोरोनाचा कहर अजूनही गेलेला नाही. तसेच प्रशासनाने देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला जळगावकरांनी चांगलीच साथ दिली. अनेकांनी घरातच सेलिब्रेशन करत नवीन वर्षाचे स्वागत केले. तर अनेकांनी आपल्या गच्चीवर लहान-मोठ्या पार्टीने ‘थर्टी फर्स्ट’ ची रात्र साजरी केली.
मद्यपींनीही घेतले १० पर्यंत आटोपतं
रात्री ११ नंतर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील बीयर बार व परमीट रुममध्ये सायंकाळी ५ वाजेपासून नागरिकांची गर्दी झाली होती. मद्यपींनीही रात्री १० पर्यंत आटोपत घेत, घरचा रस्ता पकडला. तर हॉटेल व बियर बार चालकांनीही १० नंतर आपले हॉटेल बंद केली होती.
रात्रीच्या थंडीत शेतांमध्ये रंगल्या पार्ट्या
शहरात रात्री ११ नंतर संचारबंदी लागू असल्याने शहरातील तरुणाईने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जळगाव शहराला लागून असलेल्या खेड्या गावांचा पर्याय निवडला होता. बोचऱ्या थंडीत केळी च्या बागेत शेकोट्या पेटवून रात्री उशीरापर्यंत पार्ट्या रंगल्या होत्या. पोलिसांचा धाक असल्याने फटाक्यांची आतषबाजी विनाच नवीन वर्षाचे स्वागत तरुणाईने केले.