केळी पिकास न देता गावासाठी दिले शेतातील विहिरीचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 07:14 PM2019-05-13T19:14:37+5:302019-05-13T19:16:01+5:30
यावल तालुक्यातील नावरे येथील ग्रामपंचायतीच्या विहिरींची पातळी खालावल्याने गावात पाणी प्रश्न उद्भवू लागला. यावर प्रभारी सरपंच समाधान पाटील यांनी त्यांच्या गावालगतच्या शेतातील विहिरीवरील पाईपलाईन गावातील पाणीपुरवठ्याशी जोडून गावातील टंचाई दूर केली आहे.
डी.बी.पाटील
यावल, जि.जळगाव : तालुक्यातील नावरे येथील ग्रामपंचायतीच्या विहिरींची पातळी खालावल्याने गावात पाणी प्रश्न उद्भवू लागला. यावर प्रभारी सरपंच समाधान पाटील यांनी त्यांच्या गावालगतच्या शेतातील विहिरीवरील पाईपलाईन गावातील पाणीपुरवठ्याशी जोडून गावातील टंचाई दूर केली आहे. यामुळे सध्या तरी नावरेकरांचा पाणीप्रश्न सुटला आहे.
या वर्षात तालुक्यातील अनेक गावांना इतिहासात कधी नव्हे अशा पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेक गावांना दोन दिवसांपासून तर २० दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत.
तालुक्यातील नावरे येथील पाणीपुरवठा गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या बोराळे शिवारातील विहिरीवरून होतो. ते पाणी ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या दोन टाक्यांमध्ये आणून गावास पाणीपुरवठा होत असतो. मात्र सध्या बोराळे शिवारातील विहिरीची जलपातळी खालावली आहे. यामुळे गावातील पाण्याच्या दोन टाक्या भरल्या जात नाही. परिणामी गावात पाणीटंचाई निर्माण झाली.
यावर तोडगा म्हणून प्रभारी सरपंच समाधान पाटील यांनी गावालगत असलेल्या त्यांच्या शेतातील विहिरीवरील पाईपलाईन नावरे गावात येत असलेल्या पाईपलाईनशी जोडला आणि पाणीटंचाईचा प्रश्न सोडवला. त्यामुळे शासनास कोणाचीही विहीर अधिग्रहीत करावी लागली नाही. त्यामुळे आता गावास दररोज सुमारे २० मिनिटे पाणीपुरवठा करणे शक्य झाले आहे. गुरांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पातळी खालावली. यातूनच संपूर्ण गावास पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे दिसून आले. गावचे सरपंच म्हणून पाणीटंचाईचा प्रश्न सोडविणे गरजेचे वाटले आणि सरपंच म्हणून निर्णय घेत माझ्या शेतातून येत असलेल्या सार्वजनिक पाईपलाईन शेतातील विहिरीची पाईपलाईन जोडली. त्यामुळे आता दोन विहिरी मिळून गावाचा प्रश्न मिटला आहे. यासंदर्भात तहसीलदार जितें्रद कुवर यांच्याशी चर्चा करून सांगितले आहे, असे प्रभारी सरपंच समाधान पाटील यांनी सांगितले.