चारा आणायला गेले अन् झाडाला लटकले; एकनाथ नगरातील यवकाची गळफास घेऊन आत्महत्या
By विजय.सैतवाल | Published: October 21, 2023 03:21 PM2023-10-21T15:21:54+5:302023-10-21T15:22:16+5:30
या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव : रात्री कुटुंबासोबत जेवण केले, पहाटे उठून गुरांसाठी चारा घ्यायला गेले अन् तिकडेच ठाकूर हरि राठोड (४५, रा. एकनाथ नगर, मेहरुण) यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवार, २१ ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शेती काम करणारे ठाकूर हरि राठोड हे एकनाथ नगरात राहतात. शुक्रवारी रात्री त्यांनी कुटुंबासोबत जेवण केले. त्यानंतर गुरांच्या गोठ्याजवळ ते झोपले होते. गुरांना चारा आणायचा असल्याने त्यासाठी ते वनीकरण विभागाकडे गेले. त्या ठिकाणी असलेल्या एका झाडाला त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी सात वाजेच्या सुमारात त्या परिसरात काही गुराखी गेले असता त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेतील इसम दिसला. त्याविषयी त्यांनी इतरांना माहिती दिली. काही नागरिकांनी एमआयडीसी पोलिसांना या विषयी कळविले. त्या वेळी पोलिस नाईक मुदस्सर काझी हे घटनास्थळी पोहचले व नागरिकांच्या मदतीने राठोड यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.
या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास शिवदास नाईक, फिरोज तडवी करीत आहेत. मयताच्या पश्चात आई-वडील, पत्नी, तीन मुले, एक सून असा परिवार आहे.