चप्पल घेण्यासाठी गेला आणि जीव गमावला; रेल्वे हमालाचा जळगावात मृत्यू
By Ajay.patil | Published: February 1, 2024 07:04 PM2024-02-01T19:04:29+5:302024-02-01T19:04:41+5:30
रेल्वेच्या हायहोल्टेज तारेला स्पर्श झाल्याने हमालाचा मृत्यू : सुरत मालधक्क्यावरील घटना
जळगाव - शहरातील सुरत रेल्वेगेटपुढे असलेल्या मालधक्क्यावर माल उतरविल्यानंतर रेल्वेच्या बोगीवर राहिलेली चप्पल घेण्यासाठी गेलेल्या हमालाचा रेल्वेच्या हायहोल्टेज तारांना स्पर्श लागून मृत्यू झाला आहे. गुरुवारी दुपारी ३.३० वाजता ही दुर्घटना घडली असून, या प्रकरणी रेल्वे पोलीसांकडे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संतोष रामू कुमार (वय.४५, रा.बाबरी, जि.नर्मदापुरम, मध्यप्रदेश) असे मृत झालेल्या हमालाचे नाव आहे. गुरुवारी दुपारी १२.३० वाजता रेल्वेच्या मालधक्क्यावर खतांचा माल उतरविण्याचे काम संतोष कुमार यांनी केले. संपुर्ण माल उतरविल्याचे काम पुर्ण झाल्यानंतर रेल्वेच्या बोगीवर चप्पल राहिली हे लक्षात आल्यानंतर, संतोष कुमार हे बोगीवर चढले. मात्र, उतरत असताना, त्यांचा रेल्वेच्या हायहोल्टेज तारेला स्पर्श झाल्यामुळे तीव्र झटका बसला. त्यात जागेवरच संतोष कुमार यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी रेल्वे पोलीसांनी घटनास्थळी येऊन, पंचनामा केल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.