तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का? खडसेंच्या लेकीचा संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 05:24 PM2021-04-19T17:24:48+5:302021-04-19T17:25:35+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा भासत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे. यामध्ये रविवारी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पक्षाच्या जिल्हा कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
जळगाव/मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तारेवरची कसरत सुरू असताना रेमडेसिविरची निर्यात सुरूच राहिल्याने त्याचा तुटवडा भासत आहे. केंद्र सरकारने यापूर्वीच निर्यातबंदी केली असती तर रेमडेसिविरचा तुटवडा भासला नसता. मात्र, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज रुग्णांच्या नातेवाईकांची फिरफिर होत आहे, अशी टीका माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केंद्र सरकारवर केली. तसेच, देवेंद्र फडणवीसांवरही खडसेंनी घणाघाती टीका केली होती. त्यावरुन, भाजपाआमदारा राम सातपुते यांनी खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यास, खडसेंच्या कन्या अॅड. रोहिणी खडसेंनी प्रत्युत्तर दिलंय.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा भासत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे. यामध्ये रविवारी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पक्षाच्या जिल्हा कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या ठिकाणी खडसे यांनी भेट दिली त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना खडसे म्हणाले, फडणवीस सातत्याने महाविकास आघाडी सरकार पडेल असे सांगत आहे, परंतु आपले कार्यकर्ते टिकून राहावेत म्हणून फडणवीस हा आटापिटा करत आहेत. मला वाटल फडणवीस उत्तम भविष्यकार असतील. त्यांनी आतापर्यंत चार ते पाचवेळा सरकार पडणार म्हणून सांगितले. आता त्यांनी पुन्हा २ तारीख दिली आहे. मी २ तारखेची वाट पाहतो आहे. जर २ तारखेला सरकार पडले नाही, तर त्यांचा भविष्यकार म्हणून अभ्यास कमी आहे असे मी समजेल, असेही खडसेंनी म्हटले होते. त्यावरुन, आमदार राम सातपुते यांनी खडसेंना लक्ष्य केलं.
''नाथाभाऊ आपण आयुष्यभर पैसे खायचे सोडून दुसरं काहीच केलं नाही आणि देवेंद्र भाऊ बद्दल बोलत आहात. विरोधी पक्षनेता असताना तोडपाणी आणि मंत्री झाले तेव्हा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप आमदार राम सातपुते यांनी केलाय. तसेच, निष्कलंक देवेंद्र फडणवीसांवर बोलण्या अगोदर आरसा बघा सगळं लक्षात येईल,'' अशी घणाघाती टीका राम सातपुते यांनी एकनाथ खडसेंवर केली आहे. त्यानंतर, एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांनी राम सातपुते यांना प्रत्युत्तर दिलंय.
अहो, राम सातपुते, एकनाथ खडसे जर पैसे खात होते तर मग सत्ता होती तेव्हा कारवाई का केली नाही? तेव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का?, असा संतप्त सावल रोहिणी खडसे यांनी ट्विटवरुन विचारला आहे. तसेच, तुमच्यात हिंमत असेल तर सिद्ध करा ना? शामराव फडणवीसी मिरची तुम्हाला का झोँबली? ज्यांच्याबद्दल बोलले त्यांच्या तोंडात काय मिठाची गुळणी आहे का?, असाही सवाल रोहिणी यांनी भाजपा आमदाराला विचारला आहे. त्यानंतर, आज आणखी एक ट्विट केलंय.
अहो @RamVSatpute
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) April 18, 2021
जर पैसे खात होते तर मग सत्ता होती तेव्हा कारवाई का केली नाही?तेव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का?आणी असेल तुमच्यात हिंमत तर सिद्ध करा ना ? शामराव फडणविशी मिरची तुम्हाला का झोँबली?ज्यांचे बद्दल बोलले त्यांच्या तोंडात काय मिठाची गुळणी आहे का?
एकनाथ खडसे जर भोसरी प्रकरणात दोषी होते तर चौकशी समितीचा अहवाल विधिमंडळात का मांडला नाही? दूध का दूध पानी का पानी केले असते, मंत्रिपद तर काढलेच होते... असेही रोहिणी यांनी ट्विटरवरुन म्हटलंय.
राजकारण बाजूला ठेवून मदत आवश्यक
कोरोनाच्या काळात राज्य सरकार आपल्या अखत्यारीत जे आहे, त्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. परंतु, रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने मर्यादा येत असून ज्या ठिकाणी कोरोनाची रुग्णसंख्या जास्त आहे, किमान अशा ठिकाणी तरी केंद्र सरकारने राजकारण बाजूला ठेऊन मदत करायला हवी, असे एकनाथ खडसे यांनी सांगत केंद्र सरकारवर टीका केली. ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, त्या ठिकाणी ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन तसेच इतर औषधांचा पुरवठा करायला हवा, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
कुत्रा-मांजराचा खेळ कधी खेळलो नाही
महाराष्ट्र राज्याची एक परंपरा राहिली आहे. ज्या ज्या वेळी राज्य संकटात आले किंवा आकस्मिक संकटाचा प्रसंग उद्भवला; मग तो किल्लारीचा भूकंप असो किंवा मुंबईत झालेले साखळी बॉम्बस्फोट असोत, अशा वेळी राजकारण बाजूला ठेवून विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षाने हातात हात घालून काम केले आहे. मी स्वतः विरोधी पक्षात होतो. विरोधी पक्षनेता म्हणूनही मी काम केले आहे. पण, आम्ही संकटाच्या काळात असा कुत्रा-मांजराचा खेळ कधी खेळला नाही, अशी टीका देखील खडसे यांनी विरोधी पक्षावर केली. देवेंद्र फडणवीस जे करत आहेत, मला वाटते विरोधी पक्षनेत्याकडून हे अपेक्षित नव्हते, असेही त्यांनी नमूद केले.