कोरोनाग्रस्तांच्या मतदानाचे काय, प्रश्नचिन्ह कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:13 AM2021-01-09T04:13:26+5:302021-01-09T04:13:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या मतदानाचे काय? असा प्रश्न कायम आहे. राज्य निवडणूक आयोगाने जरी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या मतदानाचे काय? असा प्रश्न कायम आहे. राज्य निवडणूक आयोगाने जरी आदेश दिले असले तरी अद्याप जिल्हा प्रशासनाने यावर नियोजन केल्याचे दिसून येत नाही. शेवटच्या अर्ध्या तासात हे मतदार कसे मतदान करणार, हा प्रश्न आहे. कारण तालुकास्तरावर अद्याप याबाबतचे कोणतेही नियोजन झालेले नाही.
जळगाव तालुक्यात सध्या १३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यातील किती रुग्ण हे निवडणुक सुरू असलेल्या गावांमधील आहे हे अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे ही आकडेवारी काढून तालुका प्रशासनाला त्या गावातील मतदारांच्या मतदानाची व्यवस्था करावी लागणार आहे. मात्र जिल्ह्यातील १५ तहसील कार्यालयांकडे याबाबतची कोणताही यंत्रणा अद्याप नाही.
ॲक्टिव्ह रुग्णपण मतदार असलेल्यांचा आकडा कसा काढणार,
जळगाव जिल्ह्यात १,५०२ महसुली गावे आहेत. त्यापैकी ७८३ गावांमध्ये निवडणूक आहे. संपूर्ण जिल्ह्यात शुक्रवारी मिळून (जळगाव शहर वगळता) २५५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यातील बहुतेक रुग्ण हे नगरपालिका, नगरपंचायत किंवा ज्या गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक नाही, अशा गावांमधील असू शकतात. त्यामुळे त्यातील नेमके मतदार किती, त्यातील अत्यवस्थ रुग्ण किती. ऑक्सिजन किती रुग्णांना सुरू आहे. त्यासोबतच इतर बाबींची आणि विशेषत: इतर मतदार आणि निवडणूक कर्मचारी यांच्या सुरक्षेची काळजी घेऊन त्यांचे मतदान करणार कसे? हादेखील प्रश्न आहे.
रुग्ण मतदान केंद्रापर्यंत पोहोचणार कसे
जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्येत असलेले मतदार पाहता त्यांना मतदान केंद्रापर्यंत नेणे हेदेखील मोठे जिकरीचे ठरणार आहे. कारण बहुतेक रुग्ण हे जळगाव शहरात आणि तालुक्यातील रुग्ण हे त्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. त्यामुळे तेथून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेणे आणि तेथे त्यांच्यापासून इतरांना लागण होणार नाही, याची काळजी घेणे हेदेखील मोठे आव्हान असणार आहे.
आकडेवारी
एकूण महसुली गावे १५०२
ग्रामपंचायत निवडणूक असलेली गावे ७८३
कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण - २५५ (जळगाव शहर वगळता)