बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:18 AM2021-05-25T04:18:13+5:302021-05-25T04:18:13+5:30
बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय? विद्यार्थ्यांमध्ये नाराजी : तत्काळ निर्णय घेण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : करोनाच्या प्रादुर्भावामुळे शालेय ...
बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय?
विद्यार्थ्यांमध्ये नाराजी : तत्काळ निर्णय घेण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : करोनाच्या प्रादुर्भावामुळे शालेय शिक्षण विभागाने इयत्ता बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या. मात्र, या परीक्षा नेमक्या कधी होणार आहेत, याबाबत अजूनही याबाबत स्पष्टता नाही. दुसरीकडे बारावीच्या परीक्षेसाठी काय पर्याय असू शकतो, यावर शासन विचाराधीन आहे. तर मोजक्या महत्त्वाच्या अनिवार्य असलेल्या विषयांची परीक्षा शासनाने घ्यावी, असा पर्याय महाविद्यालयातील प्राचार्यांकडूनही सुचविण्यात आला आहे.
राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शालेय शिक्षण विभागाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली, तर बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, मे महिनाही संपण्यात आला. ही परीक्षा कधी होईल, वर्ष वाया जात आहे, अशी प्रतिक्रिया आता विद्यार्थ्यांमधून उमटायला लागली आहे. दरम्यान, बारावीच्या परीक्षेसाठी सीबीएसईने दोन पर्याय सुचविलेले आहेत. त्यामध्ये मोजक्या महत्त्वाच्या विषयांची परीक्षा घ्यावी, जेणेकरून कमी दिवसात परीक्षा आटोपल्या जातील तसेच बारावीत विद्यार्थी ज्या कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहेत तिथेच परीक्षा घेतली जाऊ शकते, असा पर्याय दिला आहे. दरम्यान, जळगाव शहरातील महाविद्यालयातील प्राचार्यांनीदेखील महत्त्वाच्या विषयांची परीक्षा घ्यावी, असा पर्याय सुचविला आहे. तर काहींनी परीक्षेआधी विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे, असेही सुचविले.
===============
काय असू शकतो पर्याय?
बारावीची परीक्षा ही झाली पाहिजे. पण, अत्यंत महत्त्वाचे असणाऱ्या विषयांची परीक्षा व्हावी. जेणेकरून कमी कालावधीत परीक्षा पूर्ण होईल. सोबतच सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल आणि विद्यार्थ्याच्या आरोग्याची काळजीदेखील घेता येईल, हा पर्याय चांगला राहील. तीन दिवस कला, तीन दिवस वाणिज्य व तीन दिवस विज्ञान शाखेची परीक्षा घ्यावी. अर्थात ९ दिवसात बारावीची परीक्षा संपेल व निकालही लवकर लावता येईल.
- एल. पी. देशमुख, प्राचार्य, नूतन मराठा महाविद्यालय
--------
परीक्षाबरोबर विद्यार्थ्यांचे आरोग्यदेखील तेवढेच महत्वाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी न खेळता परीक्षा रद्द करण्याचा पर्यायही योग्य राहील. जर परीक्षा घ्यायचा निर्णय झाला तर त्या आधी संपूर्ण परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे शासनाने लसीकरण करावे. त्यानंतरच परीक्षा घ्यावी.
- अनिल लोहार, प्राचार्य, बाहेती महाविद्यालय
--------
बारावीची परीक्षा ही घेतली गेली पाहिजे. कारण, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे निकष खूप महत्त्वाचे आहेत. पुढे जाऊन त्यांना फार महत्त्वाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावयाचा असतो. सरसकट परीक्षा घेणे शक्य नसेल तर किमान ज्या विषयांवर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश अनिवार्य आहे, अशा विषयांची परीक्षा घेतली गेली पाहिजे. जर परीक्षा घेणे शक्य नसेल तर ज्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते ती अत्यंत पारदर्शीपणे घेतल्या जाव्यात.
- गौरी राणे, प्राचार्य, डॉ .अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महाविद्यालय
===============
- काय म्हणतात विद्यार्थी....
अभ्यासपूर्ण झालेला आहे. पण, परीक्षेचा निर्णय होत नाही. वेळ जात आहे. परिणामी, पुढे कशाला प्रवेश घ्यावा हे आता सुचेनासे झाले आहे. त्यामुळे तात्काळ निर्णय घ्यावा. परीक्षा जरी घेतली तरी आम्ही त्याला तयार आहोत. निर्णय घेण्यास जर उशीर झाला तर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होईल.
- चेतन बाविस्कर, विद्यार्थी
-----------
परीक्षा घ्यायला हवी. परीक्षा झाली नाही तर पुढे प्रवेश प्रक्रियेच्यावेळी विद्यार्थ्यांना अडचणी येतात. त्यामुळे परीक्षेसंदर्भातील निर्णय लवकर व्हावा. आणि परीक्षा घेण्याआधी शासनाने विद्यार्थ्यांचे लसीकरण घ्यावे.
- रितू पाटील, विद्यार्थिनी
-----------
परीक्षा होणे गरजेचे आहे. त्यासाठी निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महाविद्यालयांनी सुध्दा संपूर्ण काळजी घ्यावी.
- पल्लवी कंडारे, विद्यार्थिनी
===================
बारावीचे एकूण विद्यार्थी : ४९,४०३
विज्ञान : २०,१९४
कला : २०,४९१
वाणिज्य : ६,२९५
एमसीव्हीसी : २,४२३