कुलगुरूंच्या राजीनाम्यामागे दडलंय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:30 AM2021-02-28T04:30:17+5:302021-02-28T04:30:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. पी.पी.पाटील यांनी आपला राजीनामा नुकताच ...

What is behind the resignation of the Vice-Chancellor? | कुलगुरूंच्या राजीनाम्यामागे दडलंय काय?

कुलगुरूंच्या राजीनाम्यामागे दडलंय काय?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. पी.पी.पाटील यांनी आपला राजीनामा नुकताच कुलपती भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठ‌वला आहे. मात्र वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये विद्यापीठात आरोपांचे सत्र सुरूच होते. त्यातच डॉ. पाटील यांनी राजीनामा दिला. या राजीनाम्यामागे नेमके काय कारण आहे, यावर चर्चांना उधाण आले आहे. तर प्र कुलगुरु प्रा.पी.पी. माहुलीकर यांना हटवण्याची मागणी असतांना कुलगुरुंनी राजीनामा दिल्याने विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

कुलगुरू डॉ.पी.पी. पाटील यांनी राजीनामा देतांना प्रकृती अस्वास्थ्याचे कारण दिले. काही दिवस आधीच डॉ.पाटील हे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये देखील दिसले होते. सध्या ते क्वारंटाईन आहेत. सध्या विद्यापीठात होत असलेल्या प्रकारांकडे त्यांनी डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विकास आघाडीचा आंदोलनाचा इशारा

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विकास आघाडीचे ॲड.कुणाल पवार, सिनेट सदस्य विष्णू भंगाळे, एनएस.युआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, भुषण भदाणे , माजी सिनेट सदस्य अतुल कदमबांडे, पियुष नरेंद्र पाटील यांनी काही दिवस आधी कुलगुरू डॉ. पाटील यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली होती. विद्यापीठातील भोंगळ कारभारावर यावेळी प्रश्न उपस्थित केले होते. प्रा. भटकर यांच्या कथित प्रेम प्रकरणाची दोन वर्षे चौकशी झाली नाही, विद्यापीठात बेकायदेशीर ठराव करण्यात आले. संशोधन चौर्य प्रकरणात प्र.कुलगुरू यांचा राजीनामा का घेतला नाही. संशोधन चोरीचे आरोप असलेल्या प्राध्यापकांना दिलेली बढती, यासोबतच टाळेबंदीच्या काळामध्ये एका महाविद्यालयात मुलाखत घेतली एका महाविद्यालयात नाकारली. तसेच विद्यापीठा मध्ये सुरक्षा सेवेच्या ठेकेदारास कामगार कायदा ऐवजी गार्ड बोर्ड कायदा लागू करण्यासंदर्भात दीपक बंडू पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य यांची एक सदस्यीय समिती नेमली. त्यात विधी अधिकाऱ्यांना देखील समाविष्ठ केले नव्हते. नाशिक कामगार उपायुक्त यांच्याकडे झालेल्या सुनावणीच्या प्रसंगी कायदा अधिकारी आणि प्र कुलसचिव उपस्थित होते. त्यावेळीदेखील विद्यापीठाच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले होते. या सर्व प्रकरणांत खुलासा करण्याऐवजी कुलुगुरूंनी राजीनामा दिला आहे, असेही विद्यापीठ विकास आघाडीने म्हटले आहे.

कामात पारदर्शकता हवी होती - पियुष पाटील

कुलगुरू पी. पी .पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आपण सुरुवातीलाच केली होती. विद्यापीठात चालत असलेला अनागोंदी कारभार राजकीय व्यक्तींचा विद्यापिठात होत असलेला हस्तक्षेप यावर देखील आपण आवाज उठवला होता. तसेच कुलगुरू हे कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचा आरोप आपण त्यावेळी केला होता. पण कुलगुरूंनी तो फेटाळला होता. मग आता कुलगुरू यांनी राजीनामा का दिला ? याचा खुलासा करावा, असे पियुष नरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे.

राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाहीत - देवेंद्र मराठे

डॉ. पाटील यांनी राजीनामा दिला आहे. मात्र त्यांच्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाहीत. त्यांना त्यांच्या काळात झालेल्या भोंगळ कारभाराची उत्तरे द्यावीच लागणार आहेत. या गैरकारभारामागचा मुळ सुत्रधार कोण हे त्यांना स्पष्ट करावेच लागणार आहे, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी म्हटले आहे.

प्रॉक्सी कुलगुरू म्हणून काम सुरू होते - विष्णु भंगाळे

प्रॉक्सी कुलगुरू म्हणून काम सुरू होते. पी.पी. पाटील यांना विद्यापीठात काम करु दिले जात नव्हते. त्यांना फक्त रबर स्टॅम्प म्हणून वापरले गेले. त्यांच्या हातून प्र. कुलगुरू यांची नियुक्ती करत असताना संशोधन चौर्याचा आरोप असलेले पी.पी. माहुलीकर यांची नियुक्ती करून घेण्यात आली. त्यासोबतच विद्यापीठात अनेक प्रश्नांना पाटील यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असावा, असे मत सिनेट सदस्य विष्णु भंगाळे यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: What is behind the resignation of the Vice-Chancellor?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.